देशाची बेअब्रू करणाऱ्या जहरी वाचाळवीरांना भाजप केव्हा आवरणार ?....संजय एम.देशमुख
संजय एम.देशमुख
2022-06-08
जगातला सर्वात मोठा लोकशा हीवादी देश म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या भारतात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.त्या ऐतिहासिक गौरव वर्षात सोमवारी महाराष्टातील किल्ले रायगड आणि ठीकठीकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जात, धर्म,पंथांच्या पलिकडे जाऊन सहिष्णुतेचा संदेश देणारे उदारमतवादी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याच मंगलमय पर्वाच्या पूर्वसंध्येला धर्मांध भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माने मुस्लिम प्रेषित, धर्मगुरू महंमद पैगंबराबाबत विकृतीच्या वारशाने धर्मांधतेचे जहरी विष ओकून जगभर भारताच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे बेताल कृत्त्य केले. जात आणि धर्माच्या आधारावर सत्तेची समीकरणे मांडणाऱ्या भाजपसाठी ही गोष्ट नवीन नाही.असे विष ओकणारे अनेक विकृत वाचाळवीर भाजपने पोसून ठेवलेले आहेत. वेळोवेळी त्यांचा उपयोग करून घेतला जातो.त्या वंशावळीतलीच नुपूर ही एक आहे. मानसिक संतूलन घसरलेले असे आक्रस्ताळे आतापर्यंत देशात प्रसिध्द होते.परंतू त्या सुमार बुध्दीच्या हास्यास्पद विदुषकांनी देशाप्रमाणेच जगाचीही करमणूक केलेली आहेच. त्या वावटळीचे वादळवारे आतापर्यंत देशापुरतेच सिमित राहीले होते. त्या घसरलेल्या वैचारिक दर्जाच्या, अकलेची दिवाळं निघालेल्या लोकांच्या वावटळींना समर्थ बुध्दीमान आणि समाजाने कणखरपणे खडकांवर आदळवून नि:ष्प्रभ केलेले आहे.यातून त्यांनी देशातील धार्मिक सहिष्णुता किती मजबुत आहे हे वेळोवेळी देशवासियांनी दाखवून दिले.भारतातील लोक आता खरोखरच शहाणी झालेली आहेत.आपले हित अहित आणि त्याला वेळोवेळी धक्के देऊन बाधा पोहचविणाऱ्या कुरापतखोर संधीसाधू,विश्वासघातकी नेत्यांना ते आता चांगल्याप्रकारे ओळखायला लागले आहेत.म्हणूनच आत्ता सुध्दा महाराष्ट्रात ना रिकामचोट भोंग्या सोंग्यांची मात्रा चालली,ना हनुमान चालिसाचा गंध नसलेली दांभिक भक्तीची नवनित चालली.
महाराष्ट्र आणि इतर भाजपविरहीत राज्यांमध्ये , महापुरूष, क्रांतीकारक आणि धर्मगुरूंची पाहिजे तेवढी निंदानालस्ती करण्यात आली. आता मुस्लिम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबराबध्दलही अनुचित वक्तव्य करण्याचा प्रमाद भाजपकडून घडलेला आहे,की घडविण्यात आलेला आहे,ही बाब सध्या संशयास्पदच आहे. धर्म विव्देषाच्या या वणव्याची धग सातासमुद्रापार मुस्लिम राष्ट्रातही जाऊन पोहचली.त्यामुळे पर्यायाने निषेध होणे हे साहजिकच आहे.परंतू त्यामध्ये देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान होणे ही गोष्ट सहन होण्यासारखी नाही,त्याचा निषेध होत आहेच.परंतू नुपूर शर्मा ही पाठीमागे कुणी उभं असल्याशिवाय असं विस्फोटक बोलण्याची हिंमत करू शकत नाही.याला तिच्या स्पष्टीकरणाचाच सबळ आधार सुध्दा आहे.तिनेच स्वतः अमित शहा,फडणविस यांनीच स्वत: फोन करून "आम्ही तुझ्यासोबत आहोत,कुणाला काहीही म्हणून दे," म्हणून सांगीतल्याचे स्पष्ट केलेले आहे.
भाजपच्या राज्यात देशाची लोकशाही, संविधान, संस्कृती,सहिष्णुता आणि मानवतावादाला धक्के पोहचविण्याची षडयंत्रे सतत सुरू आहेत.देशाला नेहमी वादग्रस्त ठेवण्याचा विक्रम भाजपच्या नावे प्रस्थापित व्हावा, एवढं भव्य दिव्य काम त्यांचं या क्षेत्रात ठरत आहे.ईतर धर्म आणि प्रसंगी स्वधर्मातील उच्च कोटीच्या महापुरुषांवरही चिखलफेक करणाऱ्या या भाडोत्री मंडळींचे तंबू भुईछत्र्यांप्रमाणे उगवलेले आहेत.या पोसलेल्या जहरी लोकांना नशीबाने फारच चांगले आणि सुगीचे दिवस भाजपमुळे आलेले आहेत.या आगळ्या वेगळ्या पक्षात कोणतेही पद आणि मंत्रीपद मिळवायचे असेल तर शैक्षणिक पात्रता,संस्कारी, विचारी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व या पात्रतेची काहीही गरज नाही.फक्त रेट्टून खोटं बोलणारे, नितीमत्ता गुंडाळून हुजरेगीरी करणारे,आणि ज्यांच्यावर सोडण्याचा आदेश होईल त्यांच्यावर जहरी नागाप्रमाणे तुटून पडणारे पाहिजेत. धर्म,संस्कार,देश आणि समाजनिष्ठांना पायदळी तुडविणारऱ्या खुंखारांना फक्त अग्रक्रमाने येथे चढा भाव आहे. असेच जेमतेम शिक्षण असलेल्या, नसलेल्या काही नेत्यांना आणि वैचारीक गुलामांना या पक्षात कधी केव्हा त्यांच्या लाभाची लॉटरी लागेल हे सांगता येत नाही,आणि आतापर्यंत अनेकांना अशी महत्वाची पदे,मंत्रीपदे प्राप्त झालेली आहेत.स्वायत्त संस्थांमधील अनेक सेवानिवृत्त लाचार आश्रितांचीही अशी पूर्नवसने झालेली आहेत.
या पक्षाची धोरणं अनेकांना माहिती आहेत,आणि आपल्या अस्मितेला, माणूसपणाला कमीपणा आणून आपणास वैचारीक गुलामगीरीत खितपत ठेवणारा हा दरबार आहे याची सुध्दा जाणीव आहे.परंतू माहिती असूनही तो चक्रव्यूह भेदण्याची हिंमत बोटावर मोजण्याइतक्या नगण्य नेत्यांमध्येच फक्त शिल्लक आहे.त्यामुळे प्रामाणिक आणि स्वाभिमानी नेत्यांचा जीव या कोंडाळ्यात गुदमरलेला आहे,हे शल्य, वास्तविक सत्त्य ते विश्वासपात्र ठीकाणी खाजगीमध्ये व्यक्त करतांना आढळतात.बाकी सर्व हिटलरशाहीच्या उच्चतम लसीकरणाने जर्जर केलेले आहेत,आणि पक्षाबाहेर गेलाच तर त्याला पकडायला ईडी आणि सीडी लावत बदनाम करणारी सक्षम यंत्रणाही सज्ज आहेच...! " ना घरकाम ना घाटका" म्हणून वाळीत टाकण्यासाठी संविधानाच्या दुरूपयोगाची अनेक हत्त्यारं अगोदरच परजून ठेवलेली असतात.ती कशी हे महाराष्ट्रातील मानसपुत्रांना विचारलं तर ते सांगू शकतील.कारण या शाळेतील ते सध्या सर्वात बुध्दीमान विद्यार्थी म्हणून सन्मानप्राप्त आहेत.त्यावर त्यांचा अजूनही बराच अभ्यास सुरू आहे.अनेकांना गारद करणारा हा बलदंड माणूस महाराष्ट्राचा शक्तीमान म्हणून वावरतो आहे.सर्वांच्या दररोजच्या कुंडल्या,भविष्यं,ज्योतिष्यं,पंचांग सर्व सध्या त्यांच्याकडेच जमा आहेत.फक्त महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं त्यांना अजून करता आलं नाही, आणि त्यासाठी पून्हा येता आलं नाही, ही त्यांची अपूर्ण तपस्या आणि अतृप्त इच्छा आहे....!
मुस्लिम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या वाचाळवीर नुपूर शर्माने आपल्या पक्षाच्या संकुचित,विद्वेषी,आणि असहिष्णू विखारी मनोवृत्तीचे दर्शन सर्व मुस्लिम राष्ट्र आणि जगभरात घडविले.भारतात कधी महात्मा गांधी,कर्तृत्वाचा आणि विधायक मानवतावादी विचारांचा ऐतिहासिक वारसा असलेले गांधी घराणे,तर कधी सावित्रीबाई फुले,कधी संत,महापुरूष,क्रांतिकारकांविरूध्द जहाल विष ओकण्याचे काम भाजप आणि संघाची मंडळी सतत करत आली आहे.जळी स्थळी,काष्ठी आपल्या अमर्याद साम्राज्याला धक्का पोहचविणारे विचार आणि त्याचा प्रसार करणारे विरोधक त्यांना जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा तेव्हा त्यांच्यावर एकच गलका करून तुटून पडणाऱ्या प्राण्यांचा आपल्यातील गुणधर्म त्यांनी दाखवून दिला आहे.परंतू महान मानवतावादी विचारांचा कधी पराजय होत नसतो हे सत्य ओळखून असलेल्या विधायक परीपक्व विचारांच्या या देशातील अभ्यासू , चिंतनशील बुध्दीमंतांनी आणि समाजातील विचारी लोकांनी त्यांना अपेक्षित असलेले स्फोट घडू दिले नाहीत.परंतू संस्कारहिन, अविचारी नूपूरने मात्र आता त्याही पलिकडे मजल मारली आहे.तिने आपल्या सुडबुध्दीच्या , लोकशाही व संविधान प्रतारक पक्षाच्या अमानवीय विखारीपणाच्या ज्वालामुखीची धग मुस्लिम राष्ट्राला पोहचवून सर्वांना धक्का दिला आहे. त्यामुळे विश्वगुरू,महागुरू ह्या उपाधी थोडावेळ आता बाजूलाच ठेवाव्या लागल्या. त्याअगोदर एका विशाल लोकशाहीवादी भारताच्या पंतप्रधानांचे फोटो त्यावर चपलांचे ठसे उमटवून कचरापेटीवर लागण्याच्या अपमानास्पद दुर्दैवी घटना देशाच्या वाट्याला आणल्या आहेत.त्यामुळे जागतिक पटलावर आपली काय लायकी आहे,आणि यापूर्वीच्या नेत्यांची काय होती याचा बोध अंधभक्तांनी आता तरी घेतला पाहिजे.यामुळे देशाचे मोठेपण,अस्मिता,प्रतिष्ठा सांभाळण्याच्या पात्रतेत किती सक्षम आहोत हे अजून तरी तपासले पाहिजे. या धार्मिक गदारोळामुळे ही मोदींसोबतच घटनात्मक पंतप्रधान या पदाची झालेली अप्रतिष्ठा आहे.आता तो पक्षाचा विचार आहे की वाचाळ नुपूर ची नसती बडबड..... हा विषय बाजूला ठेवला तरी ठेऊन तिच्यावर पक्षाने देशाच्या वतीने कडक कार्यवाही केली पाहिजे.खरोखरच ती जर भाजपची भुमिका नसेल तर अशा विद्रोही अपराध्यांना भाजप पक्षात का ठेवते आहे? तिला पक्षातून तात्पूरतं निलंबित करणे ही कार्यवाही मानली जात नाही, कारण तिचा अपराध मोठा आहे.कारवाईसाठी विरोधी पक्षि यांवर भाजप जसा आक्रमक असते तशीच कारवाई स्वत:च्या पक्षातही करून दाखविली पाहिजे. जगात खळबळ उडवून, जागतिक सद्भावाला पोहचविण्यासोबतच देशाला आर्थिक आणि सर्वांगीण संकटात टाकणारे हे अविचारी कृत्त्य आहे. देशाच्या स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाच्या तत्वांना तिलांजली देणारा आहे.अशा अपराध्यांना जर भाजप सांभाळत असेल, धातूर मातूर कारवाई करून फक्त पाण्यावरील तरंग दाबण्याचे प्रयत्न करीत असेल,तर भाजपच्या जातिय आणि धार्मिक विव्देशाच्या धर्मांध विखारी वाटचालीवर आता जगाचेही शिक्कामोर्तब होईल. अशी देशावर दुरगामी परिणाम करणारी ही एक मोठी घटना आहे.मग असे लोक हे देशद्रोहीच मानले पाहिजेत,आणि त्यानुसार भाजपने कारवाई केली पाहिजे.शांती सद्भाव आणि बंधुत्वाच्या शांततामय मार्गाने विकाससोबतच एका आनंदी जीवनाचा उपहार देशातील नागरीकांना द्यायचा उदात्त विचार भाजपने नजरेसमोर ठेवला पाहिजे.त्यासाठी पात्रता नसलेल्या टक्क्या दोन टक्क्याच्या बिनडोक लोकांना डोक्यावर नाचवून देशातीला लोकशाही,संस्कृती आणि संविधानिक पदांची बेअब्रू करण्याचे अविचारी कारनामे बंद केले पाहिजेत.असे बेताल, बोगस, विकाऊ दलाल लोक महाराष्ट्र आणि भाजपविरहीत राज्यांमध्येही भाजपने सोडलेले आहेत,त्यांनाही संस्कार,आचार विचार,नितीमत्तेची थोडी तरी जाणीव ठेऊन आवरले पाहिजे. देशाची अब्रू आणि सुरक्षितता आणि विकासाच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अशा जहरी वाचाळवीरांना भाजप केव्हा थांबवणार आहे ? यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे....!नाहीतर वैचारिक क्रांतीच्या लाटेपुढे भाजपचा विनाश अटळ आहे.हे त्रिकालाबाधित सत्त्य समजण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्यांची, पचांगाची गरज आता निश्चितच उरलेली नाही....!
संजय एम.देशमुख
जेष्ठ पत्रकार,संपादक विश्वप्रभात,अकोला,
मोबा.क्र . ९८८१३०४५४६
Post Views: 237