एक सतेज आणि प्रगल्भ राजकीय प्रवास... : विजय चोरमारे (सत्त्यशोधक)
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 May 2022, 12:29 PM
२०१४ नंतर देशपातळीवर काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले होते, परंतु अशा खडतर दिवसांत सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करीत नेली. कोल्हापूर जिल्ह्याने राज्यातील काँग्रेसला बळ पुरवले.
गृहराज्यमंत्री, काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची एक मुलाखत इंडियन एक्सप्रेसच्या टाऊन हॉलमध्ये झाली. बुधवारी २४ मे रोजी ती प्रसिद्ध झाली आहे. ही मुलाखत वाचताना सतेज पाटील यांचा विद्यार्थीदशेपासूनचा सुमारे तीन दशकांचा प्रवास डोळ्यासमोरून तरळून गेला. एखाद्या नेत्याचा विद्यार्थीदशेपासूनचा प्रवास आपल्या नजरेसमोर होत असतो तेव्हा त्या प्रवासातील सगळे चढउतार आपल्या नजरेसमोर असतात. अशा प्रवासात संबंधित नेत्याने राजकीयदृष्ट्या प्रगती किती केली आहे, यापेक्षा त्याच्या राजकीय-सामाजिक जाणिवेचा विकास किती आणि कसा झाला आहे, हे महत्त्वाचे असते. सतेज पाटील यांच्या प्रवासाकडे मी त्यादृष्टिने पाहतो.
परवा कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सहा मे रोजी कृतज्ञता पर्व समारंभ झाला. सतेज पाटील यांच्याशी अधुनमधून संवाद होत असला तरी त्यांचे भाषण सात-आठ वर्षांनी ऐकत होतो. त्यांचा प्रवास किती प्रगल्भतेने झाला आहे, हे त्यांच्या या भाषणावरून लक्षात आले. नेमके, मुद्देसूद आणि औचित्यपूर्ण असे ते भाषण म्हणजे भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यानंतर आजच त्यांची इंडियन एक्सप्रेसमधली मुलाखत वाचनात आली. कोल्हापूरची निवडणूक जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा सद्य राजकीय स्थितीवरील अनेक प्रश्नांना त्यांनी या मुलाखतीत उत्तरे दिली आहेत. पक्षात अनेक दिग्गज नेते असतानाही जिल्हा पातळीवरील एक नेता राज्याच्या पातळीवर आपली जागा कशी निर्माण करतो, हे सतेज पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात तुमचा पाया भक्कम असला, तरच तुम्ही राज्याच्या राजकारणात जागा निर्माण करू शकता, याचाही वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला. परंतु हा पराभव त्यांच्यादृष्टिने इष्टापत्ती ठरला, असेच म्हणावे लागेल. २०१४च्या आधीचे सतेज पाटील आणि २०१४च्या पराभवानंतरचे सतेज पाटील यांच्यातील फरक ज्यांनी अनुभवला असेल त्यांना त्याची कल्पना येऊ शकेल. त्यांचा हा प्रवास फक्त त्यांच्यासाठीच महत्त्वाचा नव्हता, तर काँग्रेस पक्षासाठीही महत्त्वाचा होता.
२०१४ नंतर देशपातळीवर काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले होते, परंतु अशा खडतर दिवसांत सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करीत नेली. कोल्हापूर जिल्ह्याने राज्यातील काँग्रेसला बळ पुरवले. काँग्रेससाठी सगळीकडे निराशाजनक परिस्थिती असताना मधल्या काळात फक्त कोल्हापुरातूनच काहीतरी बरे ऐकायला येत होते. शुभवर्तमानाचा हा सिलसिला कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीपर्यंत कायम राहिला आहे.
अर्थात इथून पुढे खरा कसोटीचा काळ सुरू होतो. जिंकण्यासाठी काही बाकी नसते, तेव्हा आहे ते टिकवण्याचे आव्हान मोठे असते. सतेज पाटील यांच्यापुढे त्याच्यासह राज्याच्या राजकारणातली आपले स्थान भक्कम करण्याचेही आव्हान आहे. स्थानिक राजकारणावरील मजबूत पकड, उत्तम संघटन कौशल्य या बळावर ते त्यामध्ये निश्चित यशस्वी होतील यात शंका वाटत नाही.
इंडियन एक्सप्रेसमधल्या ज्या मुलाखतीवरून विषय सुरू झाला, त्या मुलाखतीवर नजर टाकली तर त्यातील वाक्यावाक्यातून सतेज पाटील यांची राजकीय प्रगल्भता दिसून येते. कोल्हापूरच्या निवडणुकीतील विजयाबद्दल ते सांगतात, तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा अनेक समस्या असतात ज्या स्थानिक पातळीवर सोडवाव्या लागतात. स्थानिक पातळीवरील प्रश्न आम्ही प्रभावीपणे हाताळले. कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेसची स्वतःची ताकद आहे, कारण महापालिकेत आमची सत्ता आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आम्ही आधी एक नॅरेटिव्ह निश्चित केले आणि मग विरोधी पक्षांशी समन्वय साधला. भाजपचे ध्रुवीकरणाचे राजकारण रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमधील समन्वयासंदर्भातील प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, राज्यात १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची युती आहे, मात्र आम्ही कोल्हापुरात कधीही एकत्र महापालिकेची निवडणूक लढवली नाही. मात्र निवडणुकीनंतर नेहमीच एकत्र आलो. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये सामंजस्य आणि समन्वय वाढण्याची गरज आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. त्यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर तसे कठीण होते. परंतु सतेज पाटील यांचे त्यावरचे उत्तरही त्यांची राजकीय समज अधोरेखित करते. ते सांगतात, मुंबईचं प्रकरण थोडंसं वेगळं आहे. जिथे शक्य असेल तिथे समविचारी पक्ष एकत्र काम करू शकतात. मुंबईत काँग्रेसचा स्वतःचा प्रभाव आहे आणि त्यामुळे मला वाटते की तिथे एक सौहार्दपूर्ण तोडगा काढता येऊ शकतो. स्थानिक राजकारण महत्वाचे आहे. मुंबईत एक मोठा फ्लोटिंग मतदारसंख्या आहे ज्याला स्थानिक प्रश्नांशी देणेघेणे नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशिष्ट अजेंड्यावर एकत्र येऊ शकतात.
मनसेच्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यासंदर्भात मात्र ते सावधपणे उत्तर देतात. त्यासंदर्भात आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. परंतु ती सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही. आम्ही हा विषय राजकीयदृष्ट्या हाताळू. सरकार म्हणून हे राज्य सुरक्षित आणि शांत ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. कोणत्याही अप्रिय घटना घडू नयेत यासाठी आम्ही दक्ष आहोत.
राज्यातील काँग्रेसची स्थिती हा काँग्रेसवाल्यांसह धर्मनिरपेक्ष राजकारणाबाबत आस्था असलेल्या घटकांचा चिंतेचा विषय आहे. त्यासंदर्भात छेडल्यानंतर त्यांनी, काँग्रेसला आणखी मजबूत केले पाहिजे आणि त्यादष्टिने आम्ही काम करीत असल्याचे सांगितले. आम्ही हळूहळू आमची ताकद वाढवत आहोत. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहिल्यास, आमच्या जागांची संख्या वाढल्याच दिसेल. प्रत्येक पक्षाने आपापली जागा व्यापली आहे, परंतु काँग्रेसकडे अजूनही मोठा मतदार आहे. पक्ष म्हणून आमचा स्वतःचा अजेंडा आहे आणि तो घेऊन आमची वाटचाल सुरू आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वैचारिक मतभेद आहेत, परंतु किमान समान कार्यक्रमाच्या आधारे आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
सतेज पाटील यांची ही मुलाखत एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धूसर जागांवरील पडदे बाजूला करून परिस्थितीचे स्वच्छ आणि स्पष्ट दर्शन घडवते. काँग्रेसच्या एका कर्तबगार नेत्याचेही दर्शन घडवते, ज्याने कोल्हापूरची जागा राखून महाविकास आघाडीची प्रतिष्ठा राखली. हा काँग्रेसचा आजचा महत्त्वाचा नेता आहेच, परंतु तो उद्याचाही महत्त्वाचा नेता असल्याचे आश्वासन त्यांच्या या मुलाखतीतून मिळते!
Post Views: 199