लॉकडाऊन नाही, निर्बंध वाढवू; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा इशारा


ओमायक्रॉनच्या प्रकोपाने सतर्कता
 संजय देशमुख  01 Jan 2022, 8:39 PM
   

मुंबई : ओमायक्रॉनचा संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन होऊ लागले, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत गैरसमज ठेवू नका, असेही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक होतील, असे टोपे यांनी म्हटले आहेे.
ओमायक्रॉन संसर्गाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत. संख्या वाढू नये, संसर्ग वाढू नये, यासाठीचे उपाय करणे हे पहिले प्राधान्य आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. त्यामुळे लोकांची काळजी घेणे, यालाच आमचे पहिले प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिले पाऊल असते. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.
आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरून नियंत्रणात आले, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
हॉटेल्स, सिनेमा हॉल्स, शाळा कॉलेज यावर अद्याप निर्णय घातलेला नाही. लसीकरणावर भर देण्यासाठीच्या उपाययोजना सुरु करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, तूर्तास तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार नसून हॉटेल्स, सिनेमा हॉल आणि शाळा कॉलेज सुरूच राहतील, असेदेखील राजेश टोपे यांनी म्हटलेय.
ऑटोमेटिक लॉकडाऊन म्हणजे?
लॉकडाऊनचा विषय अजूनतरी नाहीच. निर्बंध वाढवले पाहिजे, यावर विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनची भाषा आम्ही तेव्हाच केली, जेव्हा 700 मेट्रिक टन इतके ऑक्सिजन कन्झ्मशन सुरू आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात पुन्हा ऑक्सिजन कन्झमशन सुरू झाले, तर ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागेल. तशा परिस्थिती लॉकडाऊन ऑटोमोडवर असेल, असेदेखील राजेश टोपे यांनी म्हटले.
रुग्ण वाढल्यास कठोर निर्णय : पवार
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चार दिवसांच्या अधिवेशनात 10 मंत्री, 20 आमदार कोरोना बाधित झाले आहेत. राज्यात जर कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर निर्बंध वाढवावे लागतील. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाली. दररोजचा आकडा लक्षात घेऊन कितीपटीत रुग्ण वाढत आहेत, ते पाहून निर्णय घेतला जाईल. जर रुग्णसंख्या वाढत असेल तर नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे अजित पवार म्हणाले.

    Post Views:  254


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व