संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित मनिष दळवी विजयी; सिंधुदुर्ग बँकेच्या निकालास सुरुवात


 संजय देशमुख  31 Dec 2021, 10:54 AM
   

सिंधुदुर्ग: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर या निवडणुकीच्या सर्वच्या सर्व निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे.

आघाडीला मोठा धक्का, सावंत पराभूत

तसेच महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत हे माजी अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

कणकवलीत जल्लोष

दोन्ही निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने राणे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. राणे समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तर, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शुकशुकाट पसरला आहे.

39 उमेदवार रिंगणात

जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मतमोजणी सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.

    Post Views:  262


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व