जादूई स्वर ... मोहम्मद रफी
हा रुसवा सोड सखे, प्रभू तू दयाळू, अंग पोरी दर्याला तुफान आयलय भारी अशी अनेक मराठी गाणी संगितकार श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांच्याकडून गाऊन घेतली. कोणत्याही भाषेत गाताना रफी साहेबांचे स्पष्ट शब्दोच्चार हे खास वैशिष्ट्य. त्यांनी गायलेली मराठी गाणी ऐकताना एक अमराठी गायक गात आहे असं जराही जाणवत नाही, इतका भाषेचा गोडवा त्यांच्या आवाजात होता. अशा या अष्टपैलू गायकाचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला सुलतानपूर, पंजाब इथे झाला होता. रफीजींनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. यात विशेषतः लता मंगेशकर व आशा भोसले यांच्यासोबतची हिंदी चित्रपटांसाठी गायलेली गाणी तुफान गाजली. पण या सगळ्यात अच्छा जी मैं हारी चलो या गाण्याची मजा काही औरच!! मधुबाला व देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं श्रवणीय तर आहेच पण खास रफी आणि आशाताईंच्या स्वरातील लाडीक खोडकरपणामुळे ते पाहतानाही मन प्रसन्न होतं. रफीजींसाठी गाण्याचा कुठलाही प्रकार वर्ज्य नव्हता. मग ते प्रेमगीत, विरहगीत, देशभक्तीपर गीत असो नाहीतर भजन, कव्वाली असो, सर्वच गाणी त्यांनी आपल्या जादुई स्वरात गाऊन अजरामर करून ठेवली. अमर अकबर अँथनी या हिंदी चित्रपटातील शिर्डीवाले साईबाबा ही कव्वाली म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण. तसंच रोजच्या रोज असंख्य भक्तीगीतं, भजनं आपल्या कानावर पडत असतात, त्यातील एक तरी रफीजींच्या आवाजातील असतंच! नाम रे, सबसे बडा तेरा नाम, मन तरपत हरी दर्शन को आज, सुख के सब साथी, रामजी की निकली सवारी, ईश्वर अल्लाह तेरे नाम अशी अगणित ईश्वराचं गुणगान करणारी गीतं त्यांनी भक्तीमय स्वरात गायली व ती गाणी ऐकल्यावर गाण्यांतील गोडीनं श्रोत्यांची मनं ईश्वरी भक्तीरसात नक्कीच न्हाऊन निघाली असतील, यात शंकाच नाही!! बैजू बावरा या चित्रपटातील ओ दुनिया के रखवाले या गाण्यातील आर्तता, विवशता, व्याकूळता आणि क्रोध या भावनांचा अपूर्व संगम गीतात दिसून येतो तेव्हा गायक म्हणून रफीजींच्या गायकीची उंची किती उच्च होती हे समजतं. शब्दांतील अवखळपणा अचूक व्यक्त करून, कोणतंही गीत सहजतेनं व प्रत्येक भावना अलवारतेनं गाण्यातून सादर करणा-या या महान गायकास अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. आज रफीजी त्यांच्या जन्मदिनी आपल्यात नसले तरी त्यांनी गाऊन अजरामर झालेल्या गाण्यांमधून त्यांच्या जादुई सुरांनी युगानुयुगे संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करत राहतील, एवढं मात्र नक्की!!
स्मिता दळवी, खारघर, नवी मुंबई
Mo. ९८३३८६४८८४
Post Views: 251