किरीट सोमय्यांना शिव सैनिकांनी चोपले
भाजप विरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यात संघर्ष
पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पुण्यात आले असता सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवल्याने एकच गोंधळ उडाला होता.
किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या गाडीवर हाताने ठोसे मारले.
सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या जमिनीवर पडले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या हे जमिनीवर पडल्यामुळे त्यांना इजा झाली असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट लाइफ लाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापन कारणीभूत असून, लाइफ लाइन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुण्यातील आजच्या राड्यात शिवसैनिकांनी शर्ट काढून सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. अनेक कार्यकर्ते त्यांच्या गाडीसमोर अक्षरश: झोपले. यावेळी सोमय्या यांनी परिस्थितीचा अंदाज घेत ते देखील लवकर गाडीत शिरले. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावली. अन्यथा अनपेक्षित घटना घडू शकली असती. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.
शिवसैनिकांची भूमिका...
किरीट सोमय्या शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. त्यावर त्यांना बोलायला भाग पाडायचे होते. त्याबाबत त्यांना निवेदन द्यायचे होते. त्यासाठीच एक तासापासून त्यांची वाट बघत होते. यावेळी शिवसैनिकांची दिशाभूल केली गेली. ते नवीन गेटला आले असे सांगण्यात आले. तिथून आम्ही या ठिकाणी पळत आलो. त्यांच्यासमोर निवेदन केले. त्यांच्यासमोर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावले. आम्हाला ढकलून दिले. काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडले. पडल्यामुळे ते इथून पळून गेले. आम्ही पळून त्यांची गाडी अडवली. आम्ही रस्त्यावर झोपलो. त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली. आमची शिवसेना पूर्वी जशी काम करत होती तसेच काम करेल, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली.
Post Views: 519