राष्ट्रीय कर्मयोगी अवॉर्डसाठी निलेश देव यांची निवड


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक द्वारा दिला जाणार पुरस्कार
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Nov 2024, 9:19 AM
   

अकोला- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक द्वारा आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिन 2025 सन्मान सोहळ्यामध्ये अकोल्याचे सुस्वाभावी, मनमिळाऊ, नि:ष्काम, निरपेक्ष, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांना राष्ट्रीय कर्मयोगी अवार्ड 2025 ने सन्मानित केल्या जाणार आहे. हा सन्मान केवळ निलेश देव यांचा नसून तो अकोल्याचा बहुमान असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. कर्मयोगी या शब्दाला साजेल असे सामाजिक कार्य गेल्या काही वर्षांपासून निलेश देव अखंडपणे करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय कर्मयोगी अवॉर्डने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होणार असल्याचेही मत व्यक्त होत आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक द्वारा येत्या 5 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे आयोजित पत्रकार दिन सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार निलेश देव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
         अनेक प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते असतात, काही फक्त प्रसिद्धीसाठी काम करतात तर काही सामाजिक कार्याच्या माध्यमातून काहीतरी मिळवण्यासाठी कार्य करीत असतात. परंतु निलेश देव या सगळ्या गोष्टींना अपवाद आहेत. याशिवाय काही लोकांचे सामाजिक कार्य हे कोणत्यातरी एका ठराविक क्षेत्रामध्ये मर्यादित असते. परंतु निलेश देव त्यालाही अपवाद आहेत. कोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता आणि एकापेक्षा अनेक क्षेत्रांमध्ये निलेश देव यांचे सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. निलेश देव हे अकोल्यात कोणत्याही एका ठराविक क्षेत्रामध्ये नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहेत. सर्वात विशेष म्हणजे हे सर्व सामाजिक कार्य करीत असतांना ते कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाहीत. स्वतःच्या खर्चातून सर्व प्रकारचे सामाजिक कार्य ते करीत असतात. सामाजिक कार्यासाठी कोणत्याही जुन्या संकल्पना किंवा कुणाच्या वापरलेल्या संकल्पनांना ते कधीही कॉपी करीत नाहीत. तर त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम राबवितात व त्यांचा प्रत्येक उपक्रम शतप्रतिशत यशस्वी होतो, हेही विशेष! निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचे हे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू आहे.
          दरवर्षी गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळामध्ये शेकडो क्विंटल निर्माल्य तयार होते. हे निर्माण नदीमध्ये, विहिरीमध्ये मध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकले जात होते. त्यातून प्रदूषण निर्माण होऊन निर्माल्याचा अपमान होत होता. त्यावर निलेश देव यांनी एक अभिनव संकल्पना राबवून निर्माल्य रथ तयार करून संपूर्ण शहरातील निर्माल्य एकत्र गोळा केले. त्यातून खत निर्मिती करून ते खत परत नागरिकांना वितरित केले. हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व पाणी प्रदूषण थांबविण्यासाठी त्यांच्याकडून भाविकांना गणेश मूर्ती विसर्जित करण्याकरिता कुंड्यांचे वितरण केले जाते. आतापर्यंत त्यांनी हजारो कुंड्या नागरिकांना मोफत वितरित केल्या आहेत. एवढेच नव्हे तर या कुंड्यांमध्ये लावण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपटे सुद्धा मोफत वाटप केले जातात. पर्यावरणाबाबत जागृती व आपुलकी निर्माण होण्याकरिता शालेय अभ्यासक्रमात पर्यावरणाच्या विषयाचा समावेश असावा अशी मागणी निलेश देव यांनी शासनाकडे केली होती, हेही विशेष.
         दरवर्षी दिवाळी सर्वजण साजरी करतात. परंतु डोंगराळ भागात राहणाऱ्या गोरगरीब, आदिवासी बांधवांना सुद्धा दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी शहरातून नागरिकांकडून जुने परंतु चांगल्या स्थितीत व वापरण्यायोग्य असलेले कपडे गोळा केले जातात. या कपड्यांना व्यवस्थित नीटनेटके रूप देऊन ते आदिवासी बांधवांमध्ये वाटप केले जातात. कपड्यांसोबतच नागरिकांकडून विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू देखील गोळा करून त्या गोरगरीब आदिवासी बांधवांना दिल्या जातात.
        22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेपासून प्रत्येक महिन्यात 22 तारखेला अकोल्याच्या बिर्ला राम मंदिरामध्ये त्यांच्याकडून सुंदर कांडाचे आयोजन केले जाते. याच पृष्ठभूमीवर त्यांनी एक लक्षवेळा राम रक्षा स्तोत्रपठण उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला हजारो अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यातही हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी 3000 महिलांनी 75 हजार वेळा उद्देशिका वाचन केले. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हजारो शिवभक्त गांधीग्राम येथून कावडीद्वारे पाणी आणून राजराजेश्वराला जलाभिषेक चढवितात. या 18 किलोमीटरच्या कावड मार्गावर अनेकदा भाविकांना दुखापत होते किंवा त्यांची प्रकृती बिघडते. ही बाब लक्षात घेऊन निलेश देव यांनीच पुढाकार घेऊन शिवभक्तांकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कावड मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.
        थॅलेसेमिया हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. या आजाराच्या बालकांना उपचारासाठी दर महिन्याला प्रचंड खर्च करावा लागतो. परंतु काही पालक हे गरीब असल्याने एवढा खर्च करू शकत नाहीत. म्हणून निलेश देव यांनी रद्दी संकलन करून त्या रद्दीतून येणाऱ्या पैशाच्या माध्यमातून थैलेसेमिया रुग्णांना उपचारासाठी दत्तक घेतले जाते. याशिवाय महानगरपालिकेकडून अकोलेकरांवर जास्त कराचा बोजा लादण्यात आला. तेव्हा निलेश देव यांनी आवाज उठवून अकोल्यात या अन्यायकारक निर्णयाविरोधात जनजागृती करण्याचे काम सुद्धा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर शहरातील चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कर वसुली विरोधात त्यांनी अकोल्यापासून तर थेट मंत्रालयापर्यंत विविध पद्धतीने आवाज उठविला. शहराच्या विकासात अडथळा ठरू शकणाऱ्या किंवा निधी निरर्थक व्यर्थ जाऊ शकणाऱ्या किंवा कोणत्याही पद्धतीने चूक ठरू शकणाऱ्या निर्णयांविरोधात त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. त्यांचे हे सर्व अखंडपणे सुरू असलेले कार्य पाहता ते खरोखरच कर्मयोगी या शब्दास परिपूर्णपणे पात्र असल्याचे कोणीही मान्य करेल, अशा प्रतिक्रिया या पुरस्काराच्या निमित्ताने अकोलेकरांकडून व्यक्त होत आहेत.
ॲड. धनश्रीताईंचाही महत्त्वाचा वाटा
निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाद्वारे सुरू असलेल्या निलेश देव यांच्या अखंड सामाजिक कार्यात त्यांच्या सौभाग्यवती स्व. ॲड. धनश्री देव यांचा देखील तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे, हेही विसरता येणार नाही. त्यामुळे निलेश देव यांना मिळालेल्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराच्या निमित्ताने ॲड. धनश्री देव यांचे स्मरण करणेही तेवढेच महत्त्वाचे ठरेल.

    Post Views:  126


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व