शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह कमी खर्चात करण्यासाठी सुभाषराव म्हैसने यांचा पुढाकार!


पाटील समाज वधू-वर सूचक मंडळाच्या सभेत आदर्श विवाह संकल्पना; सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी गावोगावी मेळा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Nov 2026, 9:10 AM
   

अकोला : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांवर मुला-मुलींच्या विवाहाचा आर्थिक भार पडू नये, तसेच समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी उपवर मुला-मुलींचे विवाह आदर्श पद्धतीने व कमी खर्चात करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन माजी सैनिक सुभाषराव पाटील म्हैसने यांनी केले.
स्थानिक डाबकी रोड येथील आपला माणूस डॉ. अशोक ओळंबे यांच्या निवासस्थानी शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पाटील समाज वधू-वर सूचक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन अध्यक्षांची निवड करणे, ‘लगीनगाठी’ वेबसाईट अद्ययावत करणे, वधू-वर परिचय मेळावे विविध ठिकाणी आयोजित करणे, तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
विवाह समारंभामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून साध्या व आदर्श पद्धतीने विवाह करण्याची संस्कृती समाजात रुजविणे, ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह कमी खर्चात पार पाडण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभाषराव पाटील म्हैसने होते. सभेचे संचालन अॅड. संतोष गोळे यांनी केले. प्रास्ताविक वसंतराव माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरुण खोटरे यांनी मानले.
या सभेला डॉ. अशोक ओळंबे, संजय इंगळे सर, श्याम मते पाटील, प्रा. संजय म्हैसने, संजय मालोकार, मोहन पाटील, रवींद्र निर्मळ, दीपक भाकरे, चंद्रकांत ताठे, डॉ. तेजराव नराजे, प्रा. विनायकराव धोरण, नंदकिशोर गावंडे, प्रा. देवलाल उजाळे, हिम्मतराव पोहरे, रमेश बारब्दे, संतोष काटे, संतोष आखरे, आर. पी. अंधारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प या सभेतून व्यक्त झाला. आदर्श विवाहाची चळवळ समाजात व्यापक करण्यासाठी पाटील समाज वधू-वर सूचक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व