अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव!
स्वामी विवेकानंद ग्रुपचा अभिनव उपक्रम; मान्यवरांच्या प्रेरणादायी कार्याचा दस्तऐवज ठरणाऱ्या ‘अकोलारत्
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Nov 2026, 10:27 AM
अकोला : आपल्या जिल्ह्यातील, आपल्या मातीतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी, त्यांच्या संघर्षातून आणि यशातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनच्या वतीने अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये ‘अकोलारत्न पुस्तक प्रकाशन व अकोलारत्न सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कृषी, साहित्य, उद्योग, कला आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३० मान्यवरांना ‘अकोलारत्न पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. याचवेळी या सर्व मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणाऱ्या ‘अकोलारत्न’ या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
समाजात अनेक व्यक्ती आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतात. मात्र, त्यांचे कार्य अनेकदा गाव, परिसर किंवा विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित राहते. अशा व्यक्तींच्या कार्याची व्यापक समाजाला ओळख व्हावी, त्यांच्या अनुभवातून आणि संघर्षातून युवा पिढीला प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश शंकरराव ताले यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात अनेक तरुणांसमोर दिशाहीनता आणि संभ्रमाचे प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत प्रेरणेसाठी दूरवर पाहण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला, आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या मातीत अनेक आदर्श व्यक्तिमत्त्वे कार्यरत आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यातील माणसांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि यशाची ओळख नव्या पिढीला झाली, तर समाजात सकारात्मक विचारांची आणि विधायक कार्याची चळवळ निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. याच विचारातून ‘अकोलारत्न’ पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशनाचा उपक्रम साकारण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ होते. उद्घाटक म्हणून डॉ. सुधीर ढोणे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृष्णाभाऊ अंधारे, पुष्पराज गावंडे, डॉ. पराग डोईफोडे, प्रभाकर घुगे आणि डॉ. सरिताताई वाकोडे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रणजित सपकाळ यांनी ‘अकोलारत्न’ या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद ग्रुपने राबविलेला हा उपक्रम अभिनव आणि समाजासाठी दिशादर्शक आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचे योगदान त्यांच्या गावापुरते किंवा कार्यक्षेत्रापुरते मर्यादित राहते. अशा व्यक्तींच्या कार्याची समाजाला व्यापक स्वरूपात ओळख करून देणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे ग्रुपचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘अकोलारत्न’ पुस्तकाच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल मते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक ताले यांनी केले. विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणादायी कार्याचा दस्तऐवज आणि स्थानिक आदर्श व्यक्तिमत्त्वांची नव्या पिढीशी ओळख करून देणारा हा सोहळा अकोला जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
Post Views: 1