अन्न व औषध प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची निवृत्ती आणि निरोप समारंभ खर्च दवा बाजारकडून?
प्रशासन आणि दवाबाजारच्या मधुर मिलीभगतवरील हे शिक्कामोर्तब तर नव्हे !
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-10-03
अकोला - अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनातील एक ज्येष्ठ अधिकारी नुकतेच निवृत्त झाले. कोणतेही अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या सेवाकार्यातील सहकार्याच्या भावनांप्रती कृतज्ञता म्हणून निरोप समारंभ आयोजित केले जातात. ते त्यांच्या स्नेहबंधातील सहकाऱ्यांचे त्यांच्याप्रती व्यक्त होणारे प्रेम असते. यासाठी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आपसात निधी संकलन करून सहकारी आणि वरिष्ठांचे निरोप समारंभ पार पाडणे हा सामाजिक कृतज्ञतेचा कायम झालेला शिरस्ता आहे. परंतू अकोला येथील अन्न व औषध प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ मात्र येथील दवाबाजारच्या संघटना नेत्यांनी खर्च करून पार पडल्याची एक आगळी वेगळी अतर्क्य बाब घडली आहे.त्यामुळे प्रकाराची संपूर्ण विदर्भातील औषधी विक्रेते आणि नागरीकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे.
आजच्या काळात व्यवसायिक क्षेत्रात काही तरी मतलबाचे रेशमी बंध असल्याशिवाय कोणी कोणासाठी पदरचे पैसे खर्च करून समारंभ घडवून आणत नाही,हे वास्तव सत्य आहे. मग या अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ दवाबाजारवाल्यांनी घडवून आणला आणि त्या व्यासपीठावर संघटनेचे नेते विराजमान होते. हा प्रसंग दवाबाजार आणि अन्न व औषध प्रशासनाच्या हातात हात घालून आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या ज्वलंत सत्याचा परिचय करून देणारा आहे. कायद्यांचे उल्लंघन आणि नियमबाह्य बाबींकडे कानडोळा करून आपल्या अवैध उद्योगांना संरक्षणासाठी काही मधूर संबंध असतात. त्यातून कृतज्ञतेच्या प्रेमापोटी तर हा निरोप समारंभ घडवून आणला नाही ना अशी अकोलेकरांमध्ये चर्चा आहे.
हा निरोप समारंभ दवाबाजारकडून आयोजित असल्याची माहिती मिळताच नैतिकता आणि विशिष्ट तत्वांनी वाटचाल करणाऱ्या ईतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहणे टाळले. आपणावरही कोणते प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून आपल्याच अधिकाऱ्यांच्या या निरोप समारंभांपासून हे कर्मचारी दुर राहिले. मात्र या प्रकाराबाबत स्वाभिमानाचा कोणताही लवलेश नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र दवाबाजारचा हा निरोप समारंभाचा प्रस्ताव स्विकारला आणि गोड कसा काय करून घेतला याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दवाबाजारवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.ती थांबवून क्लिन चिट घेऊन ह्या फाईली कायम बंद करून घ्याव्यात म्हणून हा फंडा राबविला गेला असावा अशी माहिती काही जाणकारांकडून मिळालेली आहे.इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिध्द कॅटरर्सकडून नाश्ता, चहा आणि सर्व जय्यत व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या नवनिर्वाचित सचिवांची सकाळपासून उपस्थिती होती.
समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज असते. व्यावसायिकांकडून कायद्यांचे उल्लंघन आणि व्यवसायातील अनाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियंत्रक यंत्रणा म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. वचक ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षित अंतरावर ठेवावे हे सेवा कर्तव्याचे संकेत आणि दंडक आहेत. असे असतांना हे खातेच जर त्या दवाबाजाराचे उपहार स्विकारत असेल तर परिस्थिती धोक्याच्या रेषेजवळ पोहचलेली आहे अशी संवेदनशील नागरीकांमध्ये चर्चा आहे.वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणी जोर धरू लागली आहे.
Post Views: 184