नाशिकः आडगाव येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली. समारोपाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम महापौर सतीश कुलकर्णी आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर भुजबळांनी ही माहिती दिली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्धीचा अधिक जागर करू, असेही ते म्हणाले.
मुख्य मंडपाचे भूमिपूजन
भुजबळ नॉलेज सिटी येथे साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमिपूजन उत्साहात झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडेय, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, डॉ. शेफाली भुजबळ, मुकुंद कुलकर्णी, संजय करंजकर, सुभाष पाटील, प्रा. शंकर बोऱ्हाडे, दिलीप साळवेकर, मिलिंद गांधी, रंजन ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी भाषा ही समाजाला बांधून ठेवण्याचे काम करत असते. आईप्रमाणे अथांग असणाऱ्या मराठी भाषेला अधिक संपन्न, समृद्ध असल्याचे सिद्ध करण्याची संधी नाशिककरांना मिळाली असून या संधीचे सोने नाशिककर केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री डॉ. भारती पवार यांची कविता
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, तर समारोप कार्यक्रमासाठी खासदार शरदचंद्र पवार आणि जेष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आदी उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, प्रभू रामचंद्राच्या पावन भूमीत पार पडणार हे तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. नाशिक ही साहित्याची कर्मभूमी असून नाशिकला सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभला आहे. हे संमेलन पालकमंत्री भुजबळ यांच्या पुढाकारामुळे नाशिकच्या मराठी साहित्य चळवळीसाठी दिशादर्शक ठरेल आणि नाशिककर मोठ्या सन्मानाने येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी एक स्वरचित कविता सादर केली.
महापालिका सहकार्य करणारः महापौर
महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे साहित्य संमेलनाला उशीर झाला असला तरी आयोजकांनी केलेली तयारी अतिशय उत्तम असून बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांना आकर्षित करणार आहे. पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी यात सहभागी होऊन साहित्य संमेलनाला चांगली जागा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी करण्यात येईल असेही महापौर कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
Post Views: 264
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay