एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयात ‘स्टार्टअप व फंडिंग’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
दि. २१ ऑक्टोबर, २०२६ रोजी दि. बी.जी.ई. सोसायटीच्या श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे ‘स्टार्टअप व फंडिंग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या रिसर्च, इनोव्हेशन अँड एक्स्टेन्शन क्वालिटी सर्कलच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील राबी इन्क्युबेशन सेंटरच्या व्यवस्थापिका श्रीमती स्वाती काटोले ह्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संकल्पना, उद्योजकतेच्या विविध संधी, नवीन व्यवसायाची सुरुवात, व्यवसाय नियोजन आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देण्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःच्या कल्पनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करणे आवश्यक आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते. त्यासाठी योग्य नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, संशोधन, नावीन्यपूर्ण विचार आणि उपलब्ध शासकीय व इतर आर्थिक सहाय्य योजनांची माहिती असणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह एन.सी.सी. च्या कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉक्टर जी जी गोंडाने यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी नवीन माहिती दिली. तसेच भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची आणि आर्थिक नियोजनाची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. इंक्युबेशन सेंटरचे बिझनेस एक्झिक्यूटिव्ह दीपक लहासे यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेला आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल, डॉ. निलेश चोटिया, डॉ. दीपिका बियाणी, डॉ. अमित पुंडकर, डॉ. व्हि. डी. मोर, डॉ. व्हि. एन. जोशी, प्रा. धीरजसिंह ठाकुर व प्रा. प्रसाद दशरथ यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. महेश डाबरे यांनी केले.
Post Views: 5