नळ तोडू, पाणी बंद करू मनपाची धमकी अन्यायकारक – निलेश देवचा जाहीर इशारा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Sep 2025, 3:33 PM
अकोला – पाणी हा मूलभूत हक्क आहे, व्यापार नाही. मनपाची जबाबदारी पार न पाडता नागरिकांना धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे. अन्यायकारक पाणीपट्टी वसुली मागे घ्या, अन्यथा अकोल्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा जाहीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी दिला. नागरिकांचा दोष नाही, मनपाचीच चूक गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना अकारण व चुकीच्या पाणीपट्टी बिलांचा फटका बसत आहे. नळजोडणी नसतानाही आकारणी, मीटरशिवाय मनमानी बिलं, हद्दवाढ भागातील चुकीची वसुली या सगळ्याचा त्रास लोक सहन करत आहेत. निलेश देव यांनी आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं की –
मनपाने अनेक वर्षे वेळेवर देयक दिले नाहीत. नागरिकांचा यात कसला दोष? आता ५–६ वर्षांनंतर थकबाकी भरा नाहीतर नळजोडणी तोडू, ही धमकी नागरिकांचा अपमान आहे. दोषी जर कोणी असेल तर ती यंत्रणा आहे, नागरिक नाहीत.
बैठकीतील आश्वासनांचा भंग २० मार्च २०२५ रोजी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत खालील आश्वासनं देण्यात आली होती. चुकीची बिले रद्द करणे मीटर नसलेल्या ठिकाणांची आकारणी थांबवणे प्रभागनिहाय शिबिरे घेणे एसएमएस प्रणाली सुधारणा या निर्णयांची अंमलबजावणी होत असताना अचानक दिलेली चेतावणी ही जनतेच्या विश्वासघातासमान आहे, असे श्री. देव म्हणाले. पावसाळा, महागाई व सणांची गर्दी आज शहरात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पुढे धम्मचक्र, दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांकडून मोठ्या थकबाकीची त्वरित वसुली करण्याचा आदेश म्हणजे गरीबांच्या पोटावर लाथ असल्याचा आरोप श्री. देव यांनी केला.
नागरिकांच्या वतीने ठोस मागण्या ३० सप्टेंबरपर्यंतची चेतावणी त्वरित रद्द करावी. प्रभागनिहाय तक्रार निवारण शिबिरे सुरुच ठेवावी. मीटर व नळजोडणी नसलेल्या ठिकाणची आकारणी रद्द करावी. जुन्या चुकीच्या बिलांचा स्पष्ट लेखाजोखा द्यावा. प्रत्येक नागरिकाला पाणीपट्टी तथ्यपत्रक उपलब्ध करून द्यावे. नवीन मीटर रीडिंगपासून जुन्या चुकीच्या आकारणीपासून मुक्ती द्यावी. संघर्ष उभारण्याची तयारी जर नागरिकांवर असा अन्याय सुरूच राहिला तर आम्हाला संविधानाचा ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. हा लढा फक्त पाण्याचा नाही, तर न्यायाचा आहे, असा जाहीर इशारा निलेश देव यांनी दिला. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ यांच्या माध्यमातून हे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. अकोला शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Post Views: 72