सण उत्सवापासून व्हीआयपी बंदोबस्तापर्यंत वाहतूक पोलिसांची चोख कामगिरी
शांतता समिती व जुलूस कमिटीकडून पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे आभार
अकोला : सण म्हणजे केवळ उत्सव नाही, तो सामाजिक एकोपा, शिस्त आणि प्रशासनाची कसोटी असते. या कसोटीवर अकोला शहर यंदा अव्वल ठरले आहे. श्रावणातील पवित्र कावड यात्रा, बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण पोळा, चिमुकल्यांचा लाडका तान्हा पोळा, गणरायाचे थाटामाटातील *गणपती आगमन-विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा नूरमय ईद-ए-मिलाद-उन-नबीचा जुलूस*असे सर्व मोठे सण शहरात अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सलोख्याने पार पडले आहेत.
हे चित्र आपोआप घडले नाही. यामागे आहे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे सक्षम आणि दूरदृष्टी असलेले मार्गदर्शन, आणि ते मार्गदर्शन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवणारे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम.
सणापासून बंदोबस्तापर्यंत - जबाबदारी एकच
वाहतूक पोलिसांचे काम केवळ शिट्टी वाजवून वाहने थांबवण्यापुरते मर्यादित नाही. कावड यात्रेतील हजारो शिवभक्तांचा भार, पोळा आणि तान्हा पोळ्याच्या मिरवणुकीतील बैलजोड्या आणि बालगोपालांचा उत्साह, गणपती विसर्जनातील लाखोंची गर्दी आणि ईदच्या जुलूसमधील शिस्त, हे सर्व त्यांनी समर्थपणे सांभाळले आहे. त्यांचे हे कार्य केवळ शहरापुरते नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस झट घेतली आहे.
इतकेच नाही, तर येणाऱ्या काळात होणारा नवरात्र उत्सवातील नवदुर्गा स्थापना, विजयादशमीची धम्मचक्र प्रवर्तन दिनाची भव्य धम्मचक्र रॅली, दीपोत्सवाची दिवाळीआणि या काळात होणारे व्हीआयपी दौरे,*तसेच कायदा व सुव्यवस्थेचा अतिरिक्त बंदोबस्त ही सर्व जबाबदारी वाहतूक शाखा चोखपणे बजावत आहे आणि बजावणार आहे.
कडक ऊन, पावसाची पर्वा न करणारी निष्ठा
भर उन्हात ४५ अंशावर डांबरी रस्त्यावर उभे राहणे, मुसळधार पावसात भिजत वाहने नियंत्रित करणे सोपे नाही. मात्र PI विलास पाटील यांनी कधीही तक्रार केली नाही. हातात शिट्टी, खाकीत रुबाब आणि सेवाभाव घेऊन ते प्रत्येक चौकात खंबीरपणे उभे असतात. सणासुदीत तर १६ ते १८ तास सलग ड्युटी करून, घरचा सण बाजूला ठेवून ते अकोलेकरांच्या सेवेसाठी झटतात.यातील महत्वाचे रस्त्यावर एकही अपघात होऊ दिला नाही...
सर्वधर्म समभाव - हाच सामाजिक संदेश
अकोला हे हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक आहे. येथे बाप्पाचा जयघोष जेवढ्या उत्साहात होतो, तेवढ्याच अदबीने ईदचा जुलूस निघतो. दोन्ही समाजाच्या भावना जपत कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे, हेच खरे सामाजिक कार्य आहे. विलास पाटील यांनी सर्वधर्म समभाव जपत सर्व सणांना समान न्याय दिला आहे.
नागरिकांकडून कृतज्ञता
या उल्लेखनीय कार्याबद्दल शांतता समिती व जुलूस कमिटीने पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलिस निरीक्षक विलास पाटील आणि संपूर्ण अकोला पोलीस दलाचे जाहीर आभार मानले आहेत. विलास पाटील यांनी केलेले काम हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी केले आहे. रात्रंदिवस झटून त्यांनी आमचे सण सुरक्षित केले. माझ्याजवळ शब्द नाहीत, कितीही अभिनंदन केले तरी कमीच आहे," अशी भावना शांतता समितीच्या सदस्याने व्यक्त केली. जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, "अकोला वाहतूक पोलिसांचे नियोजन अप्रतिम आहे. जुलूस असो वा विसर्जन, त्यांनी कधीही अडथळा होऊ दिला नाही." पोलिसांवरील विश्वास आणि नागरिकांचा सहभाग यातूनच खरी सामाजिक शांतता निर्माण होते, हेच अकोल्याने दाखवून दिले आहे.
Post Views: 1