फडतूस....काडतूस अन् घरकोंबडा... बेताल राजकीय झुंजी..विकासाचे काय?


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Apr 2023, 3:07 PM
   

            राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संवेदनशीलतेचा कोणताही समन्वय राहिलेला नाही.जनतेचा उगवणारा सुर्य या  राजकीय कोंबड्याच्या झुंजी पाहण्यात जातो. हा  बेजबाबदार धांगडधिंगा पाहत येणारा अस्त आणि त्यानंतरची रात्र व्यतित होते.स्वतःच्या जीवनमानाच्या चिंतेत कसे तरी दिवस ढकलण्यात जनतेच्या आयुष्यातील अनेक वर्षे ही अशी फुकट जात आहेत.या महाराष्ट्रातील राजकारण्यांचा जन्म हा फक्त  राजकारण करत स्वतःच्या राजकीय, आर्थिक आणि अबाधित वर्चस्वाच्या सुरक्षा मजबूत करण्यासाठी झालेला असावा असा समाजाचा आता पक्का समज झालेला आहे. गेल्या ९ वर्षांपासून गेलेला प्रत्येक दिवस जनतेच्या प्रश्नांना बगल देत फक्त राजकारण आणि घसरलेल्या विचारातील अर्थकारण करण्यात गेला. येणाऱ्या दिवसातही परिस्थिती सुधारेल यांची सुतराम शक्यता दिसत नाही. जनतेने निवडून दिलं ते आपले स्वत:चे हित सांभाळत ढेकर येईपर्यंत पोटं भरण्यासाठी नाही, तर त्यांचे प्रश्न  सोडवण्यासाठी! ही थोडीशीही सद्भावना  या राजकारण्यांमध्ये शिल्लक राहू नये हे संपूर्णत: घसरलेल्या मनोवृत्तीतील हलकट राजकारणाचे होत असलेले चिंतनिय दर्शन आहे.
            ठाकरे गटाच्या शिवसेना महिला नेत्यांवर हल्ला झाला आणि पर्यायाने आरोप हा शिंदे गटाकडे येणारच.त्या प्रकरणात योग्य ती कार्यवाही झाली नाही.ती जाणूनबूजून केल्या जात नाही या संतप्त भावनेतून ठाकरेंनी गृहमंत्र्यांच्या कर्तव्याकडे  अंगुलीनिर्देश केला. ते गृहमंत्री असूनही हल्लेखोरांवर कार्यवाही होत नसेल तर या कृतीने जबाबदार गृहमंत्र्यांच्या कर्तव्य आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच. तशीच गोष्ट जर भाजप बाबतित घडली असती, आणि  उपमुख्यमंत्री फडणविसांऐवजी आघाडी सरकारची सत्ता असती तर देवेन्द्रजी मुग गिळून गप्प राहण्याईतके  सौजन्न्यशील निश्चितच राहिले नसते.उध्दव ठाकरेंच्या वक्त्वव्यामधून आक्षेपार्ह्य गोष्ट एकच घडली, ती म्हणजे फडतूस शब्द.  कारवाईची चालढकल आणि गृहमंत्री म्हणून शिंदे गटांच्या लोकांवर आरोप आहे म्हणून कार्यवाहीत दिसलेला पक्षपात त्यांना असह्य झाला.तसाच तो कोणत्याही राजकीय नेत्यांना झालाच असता.परंतू आज दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून तर गल्लीपर्यंत भाजपनेत्यांची चालू असलेली मनमानी ,अहंकारी आणि बेकायदेशीर व इतरांवर सतत अन्याय करणारी वाटचाल ही संताप आणणारी अनावर झालेली आहे.यालाच लोक आज हुकूमशाहीच म्हणत आहेत.उध्दव ठाकरे तर विरोधी पक्षाचे नेतेच आहेत.परंतू महापुरुषांची,देवतांची,आणि संतांची नावे घेत सतत अक्षम्य अन्यायी, पापी आणि क्रूर राजकीय षड्यंत्रे हा भाजपचा स्थायीभाव बनलेला आहे.त्यामुळे जनताच आता पश्चातापाच्या वणव्यात होरपळून तप्त होत आहे. हे तापमान वाढणेही योग्य नाही याची काळजीही भाजपने घेतली पाहिजे.
         ‌          उध्दव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख आणि विरोधी पक्षनेते जरी असले तरी ते त्यापूर्वी एक माणूसच आहेत. म्हणून संतप्त होऊन‌ त्यांनी देवेन्द्र फडणवीसांना फडतूस म्हटले. गुंडांवर कार्यवाही़ करीत नसाल तर त्यांना संरक्षित करणारे गुंडमंत्री हे वेगळे मंत्रीपद निर्माण करा म्हणून आपला रोष व्यक्त केला. हे शब्द साहजिकच फडणवीस आणि कंपनीच्या जीव्हारी लागले. वापरलेले शब्द योग्य नव्हतेच तसेच ते समर्थनिय नाहीतच. परंतू यापूर्वी आणि आत्तापर्यंत स्वतः फडणवीस आणि काही भाजपनेते उध्दव ठाकरे आणि आघाडी नेत्यांच्या बाबतित सगळं सभ्यतेच्या चौकटीत राहूनच बोललेले नाहीत.हे सारा महाराष्ट्र पाहतो आहे. याबाबत जनता येथेच्छ हसून नंतर संताप आणि पश्चात्ताप व्यक्त करते आहे.केवढी ही कर्तव्य प्रतारणेच्या चिल्लरपणाची दिगंत कुकिर्ती...! असे जुलमी, विघातक आणि पक्षपाती राजकारणी विदेशात शोधूनही सापडत नाहीत. हे त्यांनाच माहिती असल्यावरही स्वार्थ आणि राजकारणापुढे त्यांना या विषयात कोणताही अपराधीपणा किंवा वैषम्य वाटत नाही. एवढे निगरगठ्ठपणात तरबेज झालेले आमचे काही नेते म्हणजे देश, महाराष्ट्र आणि लोकशाहीचे दुर्दैव आहे. कर्तव्याची बांधिलकी नसणारे अत्यंत बिघडलेले ,आणि उध्दव ठाकरेंच्या शब्दात फडतुस ज्याला विरोधी शब्द हा फालतू सुध्दा वापरला जाऊ शकतो.या पठडीतले नेते काय या देशाचा आणि राज्याचा विकास करणार ? 
          कोरोनाकाळात नियंत्रणासाठी उध्दव ठाकरेंच्या सत्ताधारी आघाडीला मदत करण्याऐवजी याच फडणवीस आणि कंपूने फक्त शुल्लक राजकारणासाठी लोकांचे जीव संकटात टाकणारे काय काय कारनामे केले हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. एक संयमशील,आणि कर्तव्यवादी तथा भावनाशील मुख्यमंत्री म्हणून जनता ही समाधानी असतांनाच याच तेव्हाच्या विरोधी पक्षियांनी आणि मतलबासाठी कुंपणापलिकडे जाणाऱ्या पतितपावनांनी जनतेच्या नजरेतून त्यांना उतरवण्यासाठी अगोदरच घरकोंबडा उपाधी देऊन टाकली.कुटूंबियांनाही सोडले नाही.बोलण्याच्या साऱ्या मर्यादा ओलांडून उरलेली कामं कंगना आणि अनेक भाड्याच्या तट्टूंकडे दिली. त्यांनी आता उध्दव ठाकरे बोलले असतील त्याही पलिकडे होईल तेवढं वस्त्रहरण करण्यात काहीच कसर सोडली नाही.
         फडणविसांनी उध्दवजींच्या फडतूस शब्दांवर पलटवार करतांना स्वतःला काडतूस करवून घेतलं आणि झुकेगा नहीं तर सिधा घुसेगाही म्हटलं. देवेद्रजी आपण आणि भाजप काडतुसे सोडून आघात करणारेही आहात आणि सरकारे पाडून साम दाम दंडभेदाने दुसऱ्यांच्या किल्ल्यांमध्ये घुसण्यातही किती माहिर आहात यांची प्रात्यक्षिकं पाहण्यातच जनतेची आयुष्यातील चुकलेली ९ वर्ष गेलेली आहेत. महाराष्ट्रात आपण शिंदे गटाला फोडून पून्हा कसे घुसलात आणि आपली मी पून्हा येईन प्रतिज्ञा आपण कशी पूर्ण केली ते सर्व जनतेने पाहिले आहे‌. यात आपणास किती गुण देऊन उत्तिर्ण करायचे ते सुध्दा जनतेने ठरवलेले आहे. आज आपणाकडून सारे बोलतात.ज्या राणे आणि सुपूत्रांची तर वय, अनुभव कोणतीही पात्रता नसतांना ते आपल्याच बळावर किती बोलतात हे सुध्दा आपणास माहिती असले पाहिजे.
          आता खूप वर्ष झालीत.काम व्यवस्थित आणि भुमिका न्यायाच्या, कर्तव्याच्या आणि पारदर्शी जर असल्या तर उध्दव ठाकरेच काय, कोणाचीही आपणास फडतूस वगैरे म्हणण्याची हिंमत होणार नाही. या परिस्थितीला आपण स्वतःच जबाबदार आहात. म्हणून सर्वांत अगोदर आपलं कुठे कुठे चुकलं आहे आणि चुकत आहे हे लक्षात घेऊन आपल्या वाटचालीत बदल करण्याचं धाडस आपण केलं पाहिजे. विदर्भातील एक अभ्यासू आणि तरूण नेता म्हणून वैदर्भियन आपणाकडे पाहतात. त्याला तडे देण्याचीच कामं आपण आतापर्यंत करीत आला आहात. आता जनतेच्या परिक्षेत उतरायचं असेल तर सोडा कोंबड्यांच्या झुंजी आणि समाज आणि महाराष्ट्राच्या ध्येयसिध्दीसाठी विकासाच्या मुळ मार्गावर या..!
संजय एम. देशमुख, निंबेकर
संपादक मोबा.क्र.९८८१३०४५४६

    Post Views:  289


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व