उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुष्काळसदृश भागाची पाहणी


शेतक-याला वा-यावर सोडणार नाही; भरघोस मदत करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:25 AM
   

अकोला : कमी पर्जन्यमान आणि पावसातील खंड यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, शेतक-यांनी धीर सोडता कामा नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश् परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बाळापूर तालुक्यातील धधम व व्याळा या गावांना भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार संजय गायकवाड, आमदार किरण सरनाईक, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार विप्लव बाजोरिया आदी उपस्थित होते.  
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धधम येथे जी टी जाधव यांच्या शेतात व व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नैसर्गिक संकटाने हताश झालेल्या शेतक-यांना त्यांनी दिलासा दिला. ते म्हणाले की, शेतक-यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्यासोबत उभे आहे. येणारी दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकरी बांधवांना भरघोस मदत करण्यात येईल. यासंबंधी कॅबिनेटमध्येही चर्चा झाली असून, लवकरच अधिसूचना काढण्यात येईल.
 ते पुढे म्हणाले की, पावसात प्रदीर्घ खंड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. तूर, सोयाबीन व इतरही पीकांचे नुकसान झाले. अशा वेळी सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.  यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

    Post Views:  17


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व