‘ही प्रेमाची बरसात आहे’ प्रेमकवितेच्या कार्यक्रमाने अकोलेकरांना चिंब भिजवले!


\'आनंदी गुरुकुल\'च्या पहिल्या प्रेमकविता कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:22 AM
   

अकोला : प्रेमाच्या विविध भावछटांना शब्दांची सुंदर साथ देत, कविता आणि भावनांचा मनोहारी मिलाफ घडवून आणणारा ‘ही प्रेमाची बरसात आहे’ हा प्रेमकवितांचा बहारदार कार्यक्रम शिवम बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन, अकोला यांच्या निर्मितीतून रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी मलकापूर, अकोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात सादर करण्यात आला.
‘प्रत्येकाच्या मनातील प्रेम कवितेच्या माध्यमातून सादर करणारा’ हा आगळावेगळा उपक्रम आनंदी गुरुकुलच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आला होता. प्रेम, नातेसंबंध, भावना, आठवणी आणि मनातील हळवे क्षण यांना कवितेच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडत या कार्यक्रमाने वातावरणात भावनांची सुंदर बरसात केली.
या कार्यक्रमात प्रा.डॉ. दीपाली सोसे, प्रा. आतिश सोसे आणि सचिनकुमार तायडे या कवींनी आपल्या प्रभावी काव्यसादरीकरणातून प्रेमाच्या विविध रूपांचा वेध घेतला. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या प्रेमभावनेला शब्दरूप देणाऱ्या कविता, भावपूर्ण सादरीकरण आणि काव्याच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या संवेदनांनी कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. प्रा.डॉ. दीपाली सोसे यांच्या सुमधुर आणि अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली.
‘ही प्रेमाची बरसात आहे’ या शीर्षकाला साजेसे वातावरण निर्माण करत काव्यसादरीकरणाची ही अनोखी मैफल रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही काळ दूर नेत प्रेमाच्या भावविश्वात घेऊन जाणारा हा काव्यप्रवास आनंदी गुरुकुलच्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये एक नवा अध्याय ठरला.
आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन, अकोला यांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यासोबतच साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविले जात असून, त्याच उपक्रमांच्या मालिकेतील ‘ही प्रेमाची बरसात आहे’ हा पहिला प्रेमकविता कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.सविता रेखे,ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एस.एस.सोसे, पोलीस अधिकारी वसंतराव इंगोले,विद्यमान  गवई, एपीआय तायडे,अंश राजपूत, आनंदी इंगोले,रिया जांगिड,संदीप देशमुख, क्षितिजा राऊत, एडवोकेट निर्मल सदाशिव, प्रसाद नीलखन, रिंकू वाहुरवाघ, शर्वरी मते, शुभम शेडगे, संचित गोपनारायण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रभावी सादरीकरणामुळे अकोला शहरातील काव्यरसिकांसाठी अशा दर्जेदार साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची नवी पर्वणी निर्माण झाली आहे.
कवितेतून प्रेमभावनेचा सुंदर आविष्कार
‘ही प्रेमाची बरसात आहे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेमाकडे केवळ एक भावना म्हणून नव्हे, तर नाती, आठवणी, संवेदना आणि माणसाच्या मनातील हळुवार स्पंदने म्हणून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रा.डॉ. दीपाली सोसे, प्रा. आतिश सोसे आणि सचिनकुमार तायडे यांच्या काव्यसादरीकरणाने या भावविश्वाला प्रभावी शब्दरूप मिळाले.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व