सशक्त मीडिया ही श्रेष्ठ विश्वनिर्मितीचे प्रभावी माध्यम : करुणा भाई


राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६च्या उद्घाटन सत्रात सकारात्मक, मूल्यनिष्ठ व उत्तरदायी पत्रकारितेचा संकल
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Sep 2026, 9:39 AM
   

आबूरोड : समाजात सकारात्मकता, शांतता, सद्भावना आणि मानवी मूल्यांना चालना देण्यासाठी माध्यमांनी अधिक सशक्त, उद्देशपूर्ण आणि उत्तरदायी भूमिका बजावण्याची गरज आहे. श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी मीडिया हा प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे प्रतिपादन मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बी.के. करुणा भाई यांनी केले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६च्या उद्घाटन सत्रात देशभरातून आलेल्या पत्रकार व मीडिया प्रतिनिधींनी सकारात्मक आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी सामूहिक संकल्प केला. ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.
अध्यक्षीय भाषणात करुणा भाई म्हणाले की, हे राष्ट्रीय संमेलन असले तरी येथे होणारे चिंतन संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना सकारात्मक परिवर्तनाच्या या प्रवासात माध्यमांनीही महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. माध्यमांनी सकारात्मक परिवर्तनाची वाहक शक्ती बनले पाहिजे. पत्रकारांनी आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ काढून राजयोगाचा अभ्यास करावा. स्वतः शांततेचा अनुभव घेतल्यास समाजातही शांततेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असे त्यांनी सांगितले.
▫️एक मिनिटाच्या मौनातून सकारात्मक चिंतनाचा संदेश
मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी.के. सरला दीदी यांनी उपस्थित पत्रकारांना श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी एक मिनिट मौन व मेडिटेशन करण्यास प्रवृत्त केले. या ध्यानसत्रामुळे संपूर्ण वातावरणात शांतता व सकारात्मकतेचा अनुभव निर्माण झाला.
मीडिया व जनसंपर्क प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक बी.के. निकुंज भाई यांनी संमेलनाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. मात्र मन सशक्त आणि सकारात्मक नसेल, तर समाजात खऱ्या अर्थाने सुख-शांती निर्माण होऊ शकत नाही. माध्यमांनी लोकांना काही क्षण आध्यात्मिक व सकारात्मक चिंतन देण्याचा प्रयत्न करावा. मीडिया केवळ ‘पॉवरफुल’ नव्हे, तर ‘पर्पजफुल’ असावा, असा सामूहिक संकल्प त्यांनी उपस्थितांकडून करून घेतला.
प्रत्येक व्यक्तीला जोडल्यास श्रेष्ठ विश्वाची निर्मिती
मुख्य वक्ते प्रा. (डॉ.) मानसिंह परमार, माजी कुलगुरू, केटीयूजेएम, रायपूर यांनी जगातील सद्यस्थितीवर भाष्य केले. युद्ध, शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि विविध देशांच्या सार्वभौमत्वासमोरील आव्हाने पाहता मानवतेला प्रेम, शांतता आणि सद्भावनेने युक्त विश्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एका मुलाला जगाचा नकाशा जोडण्याचे काम देण्यात आले होते. नकाशाच्या मागील बाजूस असलेल्या माणसाच्या चित्रापासून त्याने सुरुवात केली. माणसाचे चित्र पूर्ण झाल्यानंतर जगाचा नकाशाही आपोआप जोडला गेला. त्याचप्रमाणे एक-एक व्यक्ती अधिक चांगली घडविण्याचा प्रयत्न केला, तर श्रेष्ठ विश्वाची निर्मिती शक्य आहे, असे त्यांनी उदाहरणातून स्पष्ट केले.
भारतीय संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ ही विश्वकल्याणाची भावना आहे. सोशल मीडियाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने माध्यमांची जबाबदारी अधिक वाढली आहे. एआय मनुष्याचा पर्याय होऊ शकत नाही. माध्यमांनी श्रीकृष्णाप्रमाणे शांततेचे दूत बनून मानवतेला जोडण्याचे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
▫️मीडिया केवळ बातमी देणारे नव्हे, दिशा देणारे माध्यम
भोपालचे ज्येष्ठ पत्रकार व जनसंचार तज्ज्ञ डॉ. संजय द्विवेदी, माजी विभागप्रमुख व माजी कुलगुरू यांनी सांगितले की, संवादामध्ये लोकांच्या विचारसरणी व सवयी बदलण्याची मोठी शक्ती आहे. माध्यमांचे कार्य केवळ बातम्या देणे एवढेच नसून समाजाला योग्य दिशा दाखविणेही आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मीडिया पोहोचत असल्याने पत्रकारांनी स्वतः न्यायाधीशाची भूमिका न घेता निष्पक्षपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
▫️‘मीडिया ही लोकशाहीची धडकन’
भारत न्यूज नेटवर्क, नवी दिल्लीचे सीईओ व एडिटर-इन-चीफ डॉ. सरफराज सैफी यांनी मोठ्या संख्येने पत्रकार एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मीडिया केवळ गोंधळ निर्माण करणारे माध्यम बनणार आहे का, हा प्रश्न प्रत्येक मीडिया व्यावसायिकाने स्वतःला विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मीडिया हा लोकशाहीचा केवळ चौथा स्तंभ नसून लोकशाहीची धडकन आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती अनेकदा लोक सत्य मानतात. त्यामुळे प्रत्येक माहिती प्रसारित करण्यापूर्वी पत्रकारांनी तिची सत्यता आणि परिणाम यांचा विचार करणे आवश्यक आहे. ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत चुकीच्या बातम्यांमुळे समाजात मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जबाबदार पत्रकारिता ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
बाह्य रूपाने ब्रँडेड होण्याबरोबरच अंतर्मनानेही ‘ब्रँडेड’ होणे गरजेचे आहे. मनात समाधान व शांतता असेल, तरच समाजालाही शांतता देता येईल, असे सांगत त्यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या सकारात्मकतेसाठीच्या कार्याचे कौतुक केले.
▫️एआयच्या युगात माध्यमांची जबाबदारी वाढली : राणा यशवंत
न्यूज इंडिया नेटवर्क, नवी दिल्लीचे सीईओ व एडिटर-इन-चीफ राणा यशवंत यांनी एआय, मशीन लर्निंग आणि सायबर वॉरच्या युगातील माध्यमांच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला. तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या हितासाठी कोणत्या दिशेने होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एआय अनेक उपयुक्त कामे करीत असले तरी त्यातील संभाव्य धोके समजून घेणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मोबाईल आणि त्यातील अल्गोरिदम व्यक्तीला कोणती माहिती व कोणते विचार दिसतील, यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत आहेत. अशा परिस्थितीत माध्यमांची भूमिका केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता समाजाला शिक्षित व जागरूक करण्याचीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
▫️राजयोगातून अनुभवली गहन शांतता
जयपूर सबझोनच्या प्रभारी राजयोगिनी बी.के. सुषमा दीदी यांनी उपस्थित पत्रकारांना राजयोग मेडिटेशनचा अनुभव दिला. ध्यानसत्रादरम्यान उपस्थितांनी गहन शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला.
यावेळी कटक येथील ओडिसी डान्स अकादमीच्या कलाकारांनी मनमोहक नृत्य सादर केले. पुनीत इस्सर यांच्या स्वागतगीताने उपस्थितांना भावविभोर केले.
▫️‘मूल्यनिष्ठ मीडिया’ त्रैमासिकाचा पहिला अंक प्रकाशित
कार्यक्रमात ‘मूल्यनिष्ठ मीडिया’ या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ही पत्रिका देशभरातील मीडिया क्षेत्रात नवे विचार आणि नवे आयाम निर्माण करेल, असा विश्वास डॉ. मानसिंह परमार यांनी व्यक्त केला.
▫️दोन पुस्तकांचे प्रकाशन
या सोहळ्यात मीडिया विंगचे राष्ट्रीय समन्वयक बी.के. निकुंज भाई लिखित ‘Echoes of Soul’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे. यासोबतच रुडकी येथील ज्येष्ठ पत्रकार गोपाल नारसन यांच्या ‘वरदान’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले.
▫️कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे मीडिया विंगचे राष्ट्रीय समन्वयक शांतनु भाई यांनी सर्व वक्ते व मान्यवरांचा सत्कार केला. 
यावेळी पुणे येथील अस्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय मराठे यांनी मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर फ्रेम भेट देऊन सन्मानित केले.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व