अकोल्याच्या दऊत लेखणीने पटकाविला छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2026-06-15
   

अकोला - " छंदश्री " आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये अकोल्याच्या  " दऊत लेखणी " मासिकाने  " छंदश्री तृतीय पुरस्कार  " पटकाविला आहे. पुणे येथील छंद श्री प्रतिष्ठानातर्फे सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अंकाचे मुख्य संपादक विजय देशमुख यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका शानदार समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. सन 2025 च्या दिवाळीनिमित्ताने घेतलेल्या या स्पर्धेचा निकाल आत्ता एका आठवड्यापूर्वी घोषित करण्यात आला आहे. प्रख्यात गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी तथा भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या भाची राधाताई मंगेशकर  यांचे हस्ते  विजय देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंकाचे अतिथी संपादक म्हणून नांदेड येथील डॉ. पृथ्वीराज तौर व अकोला येथील डॉ. स्वाती दामोदरे यांनी काम बघितले होते. याच अंकातील रशियन कथेच्या " सोन्याचा दात वाली बाई  " या अनुवादित कथेसाठी  डॉ. अमित पंडित यांना अनुवादित साहित्य विभागांमध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
             सुमारे 45 वर्षांपूर्वी 1981 साली अकोला येथून प्रकाशन सुरू झालेल्या या "  दऊत  लेखणी  " मासिकाने आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले असून संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. मागील 45 वर्षापासून या अंकाच्या प्रसिद्धीचे काम अकोल्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप खाडे सांभाळीत असून त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर या अंकाची ख्याती पोहोचविली आहे.
             अकोल्यातील सेवानिवृत्त न्यायाधीश ऍड. शशिधर गोगरकर, अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, प्रा. शारदा बियाणी, प्रा. डॉ. मोहन गद्रे, प्रा. डॉ. दिलीप इंगोले, प्रा. डॉ. सुहास उगले, प्रा. डॉ. निळकंठ इंगळे, लक्ष्मीकांत देशमुख, सुभाष सातव, प्रा. डॉ. मोहन खडसे, डॉ. विनय दांदळे, श्रीकांत गोंधळेकर, गीता बाली उनवणे, डॉ. सुबाहु ठोसर, अरविंद देशमुख  प्रा. डॉ. श्रीकांत उखळकर, डॉ. रामप्रकाश वर्मा, विजय दळवी, संजय कोटणीस, प्रा. डॉ. दीपक दामोदरे, निलेश पाकदुणे  आदी मंडळी या अंकाच्या भरभराटीसाठी विजय देशमुख यांना सहकार्य करीत आहेत.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व