ओरिसातून हरवलेली महिला स्वगृही परतली; महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यश


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Aug 2024, 8:37 PM
   

अकोला : ओरिसातून चार वर्षांपूर्वी हरवलेली एक भगिनी महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा कुटुंबात परतली आहे. 
                                                                                                                                                                                                                     याबाबतची हकीकत अशी की,  बोरगाव मंजू पोलीसांना 2020 मध्ये साधारणत: 35 ते 40 वर्षांची एक महिला भटकत असताना आढळली. त्यांनी तिला निवा-यासाठी अकोल्यात जागृती महिला राज्यगृहात दाखल केले. महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिच्याशी संवाद साधताना भाषेचाही अडसर येत होता. महिला राज्यगृहाचे प्र. अधिक्षक गिरीश पुसदकर यांनी प्रथमत: तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात मानसोपचार तजज्ञांकडे तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर तिच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला. तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरूवात केली.
श्रीमती गजभिये या वेळोवेळी त्या महिलेची भेट घेवुन तिच्याशी जमेल तसा संवाद साधून तिची माहिती घेत होत्या. या संवादातून तिचे नाव रमाबाटी व तिच्या गावाचे नाव दंडागुडा हे असल्याचे जाणून घेण्यात त्यांना यश आले. नंतर त्या गावाचे नाव गुगलवर शोधण्यात आले. तिने जिल्ह्यातील मोठ्या रूग्णालयाचे नाव सांगितले. तेही गुगलवर शोधून रूग्णालयाचे छायाचित्र महिलेला दाखविण्यात आले. या प्रयत्नातून त्या महिलेचा जिल्हा नाबारंगपूर असल्याची माहिती मिळाली.  
त्यानंतर कार्यवाहीला गती आली. महिला व बालविकास अधिका-यांनी तत्काळ तिच्या जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क करून त्या महिलेचे छायाचित्र व माहिती पाठवली. तेथील जिल्हा यंत्रणेकडून ती महिला राहत असलेल्या गावात तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. मग त्या महिलेचा तिच्या कुटुंबियांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून देण्यात आले तेव्हा दोन्हीकडील व्यक्तींच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.  
 ओरिसातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचा-यासह महिलेचे पती अकोल्यात दाखल झाले. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती सापडली नाही. ती मरण पावल्याचे समजून आम्ही रीतीप्रमाणे विधी करण्याचे सुध्दा निश्चीत केले. मात्र, आज आम्हाला ती परत मिळाली, याचा खूप आनंद आहे, अशी भावना महिलेच्या पतीने व्यक्त केली. 
महिला व बालविकास कार्यालयाने विहित प्रकीया पुर्ण करून महिलेला तिच्या पतीच्या सुपुर्द केले. ओरिसा राज्यातील एका लाडक्या बहिणीला तिच्या कुटुंबासोबत जोडण्यात आले याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केली.  

    Post Views:  65


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व