संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण


पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Apr 2026, 7:24 PM
   

पुणे : बँकांमधून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना बँका (Bank) आणि वसुली अधिकारी, एजंटकडून नेहमीच तगादा लावला जातो. काही आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हफ्ते थकल्यानंतर किंवा उशीर झाल्यानंतर बँक कर्मचारी सावकारी पाशा दाखवत कर्जदारांना अरेरावीची भाषा करतात, अनेकदा संबंधित कर्जदाराकडील काही वस्तूही उचलून नेल्या जातात. तर, कधी मारहाणीची देखील घटना घडते. पुण्यातील (Pune) हडपसरमध्ये अशीच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ (viral video) देखील व्हायरल झाला आहे.  हडपसर येथील एका व्यक्तीला भररस्त्यात बँकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात, असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

अमोल कोल्हे यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत गृह विभागाने घटनेची नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही, अशी माहिती खासदार कोल्हे यांनी आपल्या पोस्टमधून दिली. 

रिझर्व्ह बँकेचा संदर्भ देत अमोल कोल्हे म्हणाले की, वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत. जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल, असेही अमोल कोल्हेंनी म्हटले. 

गृह विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी - कोल्हे

दरम्यान, या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बँकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बँकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच, या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे, असेही कोल्हे यांनी म्हटलं आहे. 

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व