पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्कयांनी घटला, तिसरी लाट ओसरतेय?


 संजय देशमुख  2022-01-31
   

पुणे : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिस-या लाटेला सुरुवात झाली. दररोजची रुग्णसंख्या २५०-३०० वरुन ५००० चा टप्पा ओलांडला. १७ जानेवारी ते २३ जानेवारी या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. बाधितांचा दर ३८ टक्के इतका नोंदवला. सरत्या आठवड्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. २४ ते २७ जानेवारी या काळात ३३ टक्के पॉझिटिव्हिटी दर नोंदवला गेला आहे. तिसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी पूर्णपणे संपलेली नाही, याकडे महापालिकेने लक्ष वेधले आहे.

पहिल्या आणि दुस-या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी कालावधीची असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी सुरुवातीपासून नोंदवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनचा पॅटर्न लक्षात घेता भारतातही तिसरी लाट एक ते दीड महिन्याची असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. २० जानेवारी रोजी रुग्णसंख्येने आजवरचा उच्चांक नोंदवला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी रुग्णसंख्या कमी हळूहळू कमी होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये दररोज शहरात ३००० ते ५००० रुग्ण आढळून येत आहेत. सध्याच्या लाटेमध्ये बहुतांश रुग्ण घरच्या घरी बरे होत असले तरी संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर कायम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार, १६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत शहरात १ लाख ९ हजार ३५० इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैकी ४१ हजार २३० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत ९१ हजार ६९० चाचण्या झाल्या. त्यापैकी ३० हजार ९८५ रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट ३३.७९ टक्के इतका नोंदवला गेला आहे. आजपर्यंत ४३ लाख २८ हजार ६५४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६ लाख ३७ हजार ३६४ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. ५ लाख ९६ हजार ९९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ९२३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

    Post Views:  181


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व