महाराष्ट्र शासनाने विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कारांची संख्या विभागानुसार वाढवावी - आमदार सुनिल प्रभु
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Apr 2026, 1:46 PM
मुंबई : राज्यातील ६० लाखांहून अधिक कामगारांच्या कार्याचा सन्मान व्हावा व त्यांची घामाची प्रतिष्ठा वाढावी यासाठी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कारांची संख्या विभागानुसार प्रत्येकी एक अशी वाढविण्याची मागणी शिवसेना नेते तथा मुंबई शहराचे माजी महापौर आमदार सुनिल प्रभु यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री अकाश फुंडकर यांचेकडे केली आहे.
सध्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत संपूर्ण राज्यातून केवळ एकाच कामगाराला विश्वकर्मा कामगार भूषण हा मानाचा व सन्मानाचा पुरस्कार दिला जातो. मात्र, महाराष्ट्रासारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि विकसनशील राज्यात ही संख्या अत्यंत अपुरी असून, अनेक पात्र कामगारांना या सन्मानापासून गेली कित्येक वर्षे वंचित राहावे लागत असल्याचे आमदार प्रभु यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
सध्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा सात विभागांमध्ये कार्यरत आहे. या मंडळाकडे लाखो कामगार नोंदीत आहेत. त्यांच्या कार्याची व योगदानाची योग्य ती दखल घेण्यासाठी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून मिळणाऱ्या एकाच पुरस्काराऐवजी प्रत्येक विभागातून एक असे किमान सात "विश्वकर्मा कामगार भूषण" पुरस्कार देण्यात यावेत, ज्यायोगे सेवाभावीवृत्तीने कार्य करणाऱ्या कामगारांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होऊन शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होईल व ते समाजाभिमुख कार्य अधिक जोमाने करतील. त्याचबरोबर कामगार वर्गामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन औद्योगिक प्रगतीलाही चालना मिळेल पर्यायाने भरीव देशसेवा घडेल.
अशा उदात्त हेतूने शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय घेऊन विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कारांची संख्या विभागाला एक, अशा पद्धतीने एक वरून सात करावी, अशा आषयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे आमदार सुनील प्रभु यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने राज्यभरातील गुणवंत कामगारांमधून आनंद व्यक्त होत आहे.
Post Views: 1