नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा परिवहन मंत्रि अनिल परब यांनी केलीय. तसंच संप मागे घेत कामावर हजर होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केलाय. अशास्थितीत आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचं सांगितलं. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावलाय.
एसटीचं आंदोलन आणि शेतकरी आंदोलन वेगळं असतं. याचा गृहपाठ न केल्यानं त्यांना तोंडघशी पडावं लागलं. ज्यांचं नेतृत्व करतो त्यांच्या अपेक्षा वाढतात. चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं अवघड. अन्यथा वाघ स्वार होणाऱ्यालाच खाऊन टाकतो, अशा शब्दात शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे आंदोलन राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो. 15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
राजू शेट्टी यांनी नाशिकमध्ये बोलताना ऊसाला 3700 रुपये प्रति टन भाव देण्याची मागणी केली आहे. साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रुपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचंही अवकाळीनं नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. छाटणी केली तरी पाऊस पडतो, नाही केली तरी पडतो. बाहेरचे व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदी करायला परवानगी देण्याची मागणीही शेट्टी यांनी केलीय.
Post Views: 229
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay