वृंदावन गार्डन सोसायटीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


सहा कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2026, 9:14 AM
   

वृंदावन गार्डन सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेल्या सहा कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे सोसायटीतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना समाजासाठी प्रेरणादायी मंच मिळाला.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. अंजली राजेंद्र सोनोने (संचालिका – सोनोने चाइल्ड केअर अँड क्रिटिकल केअर सेंटर, अकोला) या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी डॉ. अंजली सोनोने यांचे स्वागत सोसायटीमधील ज्येष्ठ महिला अलका शिवाल, विजया मैसूरकर आणि शारदा दहेलीवाले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. या कार्यक्रमात सोसायटीतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या डॉ. हंसा निखिलेश तिवारी, डॉ. किरण किशोर शर्मा (तिवारी), डॉ. जयश्री गोपाल शर्मा, डॉ. सोनल महादेवराव वांगे (तिरकर), डॉ. दिपाली बापूराव चिरांगे (खेकाळे) व  डॉ. प्राची संतोष भागवत या सहा महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व महिलांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त करून केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण सोसायटीचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे समाजातील अनेक मुलींना व महिलांना शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. अंजली सोनोने यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. घर, नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागते. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी यांना महिलांनी आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाला वृंदावन गार्डन सोसायटीतील अनेक महिला, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

    Post Views:  35


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व