पदोन्नती प्रसंगी अधीक्षक अभियंता पवन कुमार कछोट यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनला दिला एक हात सहकार्याचा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Jul 2024, 11:22 AM
अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे निरंतर दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांच्या या कार्याला संपूर्ण विश्वातून सहकार्याचे हात लाभत आहेत .महावितरण अकोलाचे अधीक्षक अभियंता श्री पवन कुमार कछोट यांनी आपल्या पदोन्नती प्रसंगी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला एक हात सहकार्याचा दिला आहे . दिनांक १ जुलै २०२४ रोजी महावितरण अकोलाचे अधीक्षक अभियंता श्री.पवन कुमार कछोट यांची छत्रपती संभाजीनगर येथे पदोन्नतीसह बदली झाली .मुख्य अभियंता अशी त्यांची पदोन्नती झाली हे कळताच महावितरणचे कर्मचारी व नागरिक श्री.कछोट यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू घेऊन शुभेच्छा देण्यासाठी आले तेव्हा श्री.कछोट यांनी भेटीसाठी येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या संस्थेला सहकार्य करण्याचे आव्हान केले. त्यांच्या या सामाजिक आव्हानाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आर्थिक स्वरूपात सहकार्य केले . हॉटेल इंद्रप्रस्थ येथे श्री.पवन कुमार कछोट यांच्या निरोप समारंभात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांना आमंत्रित करून ही देणगी संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुहास रंगारी ,मुख्य. अभियंता ,अकोला परिमंडळ,प्रमुख अतिथी श्री.आशिष चंदाराणा (व्यवस्थापक स्वतंत्र,महावितरण), प्रतीक्षा शंभरकर ,अधीक्षक अभि.स व सु.मंडळ,विशेष अतिथी म्हणून ,श्री.अजय शिंदे,अधीक्षक अभियंता वाशिम, श्री.मनीष भोपळे,उपव्यवस्थापक मानव संसाधन,अकोला परिमंडळ, श्री.गुलाबराव कडाले निवृत्त अधीक्षक अभियंता बुलढाणा, सत्कार मूर्ती श्री.पवन कुमार कछोट, सौ.योगिता पवनकुमार कछोट व श्री.ग्यानेष पाणपाटील उपस्थित होते .या देणगीतून दिव्यांग बांधवांना ब्रेल पुस्तके, व्हाईट केन, व्हीलचेअर व शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे यांनी दिली. यापूर्वीही श्री.पवन कुमार कछोट यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे .दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या दिवाळी कीट , राख्या , पूजेचे साहित्य व विविध वस्तूंची खरेदी करून दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रेरित केले आहे . यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ. विशाल कोरडे यांनी श्री.पवन कुमार कछोट यांचा सत्कार केला . मी महाराष्ट्रात कुठेही असलो तरीही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात माझे पूर्ण सहकार्य लाभणार असल्याचे श्री कछोट यांनी जाहीर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक पेटकर तर आभार प्रदर्शन श्री संजय पूरकर यांनी केले .महावितरण अकोला चे अधीक्षक अभियंता श्री.पवन कुमार कछोट यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व कर्मचारीवर्ग , नागरिक व जनप्रतिनिधी यांनी कौतुक करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 278