एल.आर.टी. कॉलेजच्या एन.सी.सी. कॅडेट्सची खामगाव येथील कॅम्पमध्ये नेत्रदीपक कामगिरी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Nov 2025, 2:19 PM
अकोला - खामगाव येथील १३ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनने आयोजित केलेल्या सी.ए.टी.सी. कॅम्प मध्ये स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. कॅडेट्सनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कॅम्पमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची निवड पी.एम. सायकल रॅली सेकंड कॅम्पसाठी करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत खामगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पचे नेतृत्व कॅम्प कमांडर कर्नल उमेश शुक्ला यांनी केले. अमरावती ग्रुपच्या ७ बटालियनमधून एकूण १५ मुले आणि २१ मुलींनी या कॅम्प मध्ये सहभाग घेतला. यामध्ये ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन, अकोला येथील एल.आर.टी. कॉलेजचे ज्युनियर अंडर ऑफिसर क्रिश करावडिया आणि कार्पोरल श्रद्धा पांडे यांचा समावेश आहे. खामगाव येथील कॅम्पदरम्यान पी.एम. सायकल रॅलीच्या प्रारंभिक टप्प्यात या कॅडेट्सनी दररोज १०० किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करून भाग घेतला. तसेच त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपल्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन घडवले. कार्पोरल श्रद्धा पांडे हिने सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग घेऊन गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त केले. त्यांच्या यशस्वी कामगिरीनंतर या दोघांची निवड अमरावती येथे आयोजित होणाऱ्या पुढील कॅम्पसाठी करण्यात आली आहे. अमरावती येथे होणाऱ्या कॅम्पनंतर महाराष्ट्रातून एकूण १२ कॅडेट्स (६ मुले आणि ६ मुली) यांची अंतिम निवड केली जाईल आणि हे सर्व कॅडेट्स पुणे ते दिल्ली असा १,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करतील. ही सायकल यात्रा पंतप्रधान सायकल रॅलीच्या माध्यमातून होणार असून, देशभरातून निवडलेले एन.सी.सी. कॅडेट्स यात सहभागी होतील.कॅम्पमधील त्यांच्या या यशस्वी सहभागाबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी.जी. गोंडाणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वर्षा सुखदेवे आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी या दोन्ही कॅडेट्सचा विशेष गौरव केला. बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजीतजी परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा आणि अन्य सर्व कार्यकारी सदस्यांनी कॅडेट्सच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 17