अकोला - अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे 20 टक्के काम बाकी असतानाही कंत्राटदार मर्जीने काम करीत असल्याचे समोर आले आहे. जलप्रदायचे अधिकारी कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्रस्त झाले आहेत. निवडणूका जवळ आल्याने नगरसेवकही प्रभागातील अर्धवट कामे उरकण्यासाठी घाई करीत असल्याचे चित्र दिसत असतानाही आयुक्त कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याची परिस्थिती आहे.
अमृत योजने अंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्याचे कामाची गती पाहता अजूनही 20 टक्के काम बाकी आहे. कामाची संथगती व सर्वपक्षीय सदस्यांच्या तक्रारी पाहता आयुक्त कविता द्विवेदी यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र कंत्राटदाराने आयुक्तांसमोर लोटांगण घेऊन काम अटी व शर्थीनुसार करण्याचे मान्य केले होते. त्यानंतरही कंत्राटदाराची मनमानी सुरूच असून जलप्रदायचे अधिकारी त्रस्त झाले आहेत. महापालिका निवडणूक पाहता नगरसेवकही आपापल्या प्रभागातील अर्धवट कामे करून घेण्यासाठी प्रशासनाला सळो की पळो करून सोडत असल्याची परिस्थिती आहे.
त्यानंतरही कंत्राटदार विविध कारणे सांगून अधिकाऱ्यांनाच झुलवत ठेवत असल्याचे समोर आले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात कुठले ना कुठले काम अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठल्या भागात दोन दिवसाआड तर कुठे चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची परिस्थिती दिसत असून काही ठिकाणी जलवाहिनीच्या जोडण्या रखडल्या आहेत. परिणामी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नसून नागरिकही त्रस्त झाले आहेत.
जलप्रदाय विभाग त्रस्त
कंत्राटदाराने अक्षरशः जलप्रदाय विभागातील अधीकारी व कर्मचाऱ्यांना त्रस्त करून सोडले असून कुठलेच काम धड होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी वर्ग कंत्राटदाराच्या मनमानीला कंटाळले आहेत.
Post Views: 264
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay