जीवनाचा व जिवात्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान महत्वपूर्ण - ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकर डॉ. रवींद्र भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
21 Dec 2024, 8:17 AM
सिंगापूर - पुणे : गीता कर्मयोग ,भक्तीयोग ,ज्ञानयोग शिकविते. ममकर्म,ममधर्म समजणे यासाठी म्हणजे गीतेचा अभ्यास होय. कर्तव्यापासून परावृत्त होणाऱ्या अर्जुनाला भगवंताने गीता कुरुक्षेत्रावर कथन केली व कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करून युद्धासाठी सज्ज केले. माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञानाचे विस्तारीकरण करून जगाला अमृतमय ज्ञानेश्वरी लिहून अविवेकांची काजळी घालवून ,विवेक दीप उजळविला व साधकांना , योगीयांना निरंतर दिवाळीचा, आनंदमय चैतन्यमय ठेवा दिला. जीवनातील रहस्य समजण्यासाठी गीता व ज्ञानेश्वरीचे वाचन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवनाचा व जिवात्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी संतांनी जीवाची पराकाष्टा केली व जीवनाचे गुह्य गुपित ज्ञान जगाला दिले. जीवनाचा व जिवात्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी गीतेतील, ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. समस्त ग्रामस्थ मंडळी सिंगापूर व विठ्ठल रुखमाई भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण सोहळा सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी हरिभक्त ह भ प डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.रवींद्र भोळे पुढे म्हणाले की सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्व रसांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी जरूर वाचावी. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळे जी शांती मिळते ती जगामध्ये कोणत्याही गोष्टीपासून मिळू शकत नाही. याप्रसंगी सतत एकतीस वर्षे पासून प्रवचन रुपी सेवा देणारे ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांना स्व ह भ प दत्तात्रेय हरिभाऊ लवांडे माजी सरपंच सिंगापूर यांच्या स्मरणार्थ कानिफनाथ दत्तोबा लवांडे यांचे वतीने अखंड हरिनाम सप्ताह 2024 खास सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मोहन दादा उसळ माजी सरपंच, लक्ष्मणराव उरसळ संचालक पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ , बाळासाहेब कोरडे अध्यक्ष भजनी मंडळ , माऊली आप्पा कोरडे माजी सरपंच, ईश्वर तात्या उरसळ माजी सरपंच, अक्षय उरसळ ग्रामपंचायत सदस्य सिंगापूर, ह भ प सुभाष अण्णा कुंभारकर महाराज व्यासपीठ चालक, ह भ प कांबळे महाराज, गावकरी भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 11