राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न


 विश्व प्रभात  11 Oct 2024, 6:22 PM
   

अकोला ः संतविचारांचा प्रभावी प्रचार प्रसार करणारे निष्ठावंत कीर्तनकार निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेवून विश्वस्नेह फाउंडेशन अकोला द्वारा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय अकोल्यात सुरू करण्यात आले आहे, यामध्ये कोणतेही शुल्क न आकारता आदर्श, अष्टपैलु, किर्तनकार घडविण्याचा प्रयत्न राहील. या विद्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात जानोरकर मंगलकार्यालयात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटन म्हणून लाभलेले विदर्भरत्न हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी आपल्या भाषणातून आज या पिढीला अशा विचारांची तथा परंपरेची अत्यंत आवश्यकता आहे. भरकटलेला समाज सुव्यवस्थित नांदावा, सोबतच राष्ट्रसंताना अपेक्षीत माणूस यामधून घडावा व निश्चितपणे घडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हभप प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी किर्तन महाविद्यालय सुरू करण्यामागची भुमिका व्यक्त करताना प्रत्येक जिवाला समाजाचे देणं लागतं या माध्यमातून आम्ही स्व खर्चातून आणि काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे पाऊन उचलले आहे. समाजामध्ये संतांच्या विचारांची रुजवणूक व्हावी, या प्रामाणिक हेतूने हे महाविद्यालय साकारण्यात आले, अशी भूमिका मांडली.  
या उद्घाटनाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले वारकरी दर्पणचे संपादक हभप सचिन महाराज पवार (पुणे) यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांनी सांगितलेला धर्म हा मानवतेचा, सेवेचा धर्म आहे, राष्ट्रसंतांचा विचार हा वैज्ञानिक आहे. सकळ मानवतेची सेवा प्रत्येकाकडून घडावी हा संदेश दिला आहे. महाराजांचे साहित्य आपण वाचले पाहिजे आणि ही चळवळ व्यापक झाली पाहिजे, यासाठी प्र्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे पवार महाराज यांनी आपल्या भाषणातून मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुस्तके हे खूप महत्वाची असतात. शालेय शिक्षणासोबतच मानवी जीवनाला संस्काराची आवश्यकता आहे, या किर्तन महाविद्यालयातून हे दोन्ही उद्देश निश्चितपणे सफल होतील व त्याकरीता आपण हवे ते प्रयत्न करू, असे विचार आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. तसेच इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आचार्य वेरुळकर गुरुजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणजी गमे, हभप बळीराम महाराज दोड, जनार्दनपंत बोथे गुरुजी, हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ, डॉ. गजानन नारे, डॉ. रामेश्वर भिसे, हभप संदीप महाराज गिऱ्हे, हभप प्रशांत महाराज ताकोते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वाहोकार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सुमित जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील इंगोले मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे, डॉ. श्रद्धाश्री ठाकरे, प्रा. डॉ. स्वप्नील इंगोले, प्रा. विजयजी वाहोकार, प्रा. सुमित जोशी, रामरावजी पाटेखेडे,  इंजी. विश्वास कुरवाडे, रोशन गावंडे, विकास जाधव सुयोग उगले, प्रशांत कोल्हे, मोहित ढोले, अतुल डोंगरे, प्रवीण ठाकरे, पंकज देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. 

    Post Views:  84


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व