बेलखेड येथे ऋषिपंचमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम...


श्रींच्या पालखी सोहळ्याने गाव दुमदुमले; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ...
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Sep 2026, 3:16 PM
   

बेलखेड : श्री संत गजानन महाराजांच्या जयघोषाने बेलखेड नगरी भक्तिमय झाली. ऋषिपंचमी निमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी श्रींच्या पालखी सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाने उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
ऋषिपंचमीच्या निमित्ताने सकाळी श्री संत गजानन महाराजांची पालखी वाजतगाजत गावातून काढण्यात आली. पालखी सोहळ्यात ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. श्रींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
पालखी सोहळ्यानंतर दुपारी मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. बेलखेडसह परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची मोठी गर्दी असूनही संस्थानच्या स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले.
बेलखेड येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रगट दिन, ऋषिपंचमी, आषाढी एकादशी तसेच हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. धार्मिक उपक्रमांसोबतच संस्थानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही सातत्याने राबविले जात आहेत.
मंगल कार्यालयाच्या शेडसाठी मदतीचे आवाहन...
दरम्यान, श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने सध्या मंगल कार्यालयाच्या शेडचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी भाविक, ग्रामस्थ तसेच दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व