मला अपेक्षित मुलींचे स्वातंत्र्य
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2022-10-01
निसर्गाने प्राणी निर्माण करताना शारीरिक रचना, जी जीवनाला पुढे नेण्यासाठी व जीवनाला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, सोडून इतर कोणताही भेदभाव केलेला नाही. भारतीय राज्यघटनेनेही स्त्री-पुरूष समानता हे तत्त्व स्वीकारताना स्त्री-पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला जाऊ नये असे लिहून ठेवलेले आहे. मानव प्राणी जन्माला आल्याबरोबर त्याला निसर्गदत्त स्वातंत्र्याचे देणे मिळते. परंतु इतर पशु पक्षी पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असताना मानवातील मादीला ते एकतर नाकारले जाते किंवा त्यांचा मर्यादित लाभ दिला जातो. मनुस्मृतीमध्ये पण स्त्रियांना हीनत्व देण्यात आलेले आहे. तिला ताडन के अधिकारी म्हणताना पशुंसारखा दर्जा दिलेला आहे. पायीची वहाण पायीच बरी या दॄष्टीनेही तिच्याकडे पाहिले जाते. पुरुषप्रधान संस्कृतीला अनुसरून मानवाचे वर्तन राहिलेले आहे. त्यामुळे तिचे स्वातंत्र्य हा नेहमीच वादाचा व चर्चेचा विषय राहिलेला आहे. स्त्रीला देवी मानणाऱ्या समाजात, तिची मनोभावे पूजा करणाऱ्या समाजात स्त्रियांची होणारी विटंबना, चेष्टा, पिळवणूक, शोषण, उपहास आणि अपमान हा चिंतनाचा विषय आहे. तिला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे म्हणणे वा सांगणे वा तसा उपदेश करणे व तिला प्रत्यक्षात स्वातंत्र्य देणे यांतील फरक खूप मोठा आहे. स्वत:च्या आईला, पत्नीला, बहिणीला, सुनेला किती मान मिळतो व किती स्वातंत्र्य दिले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. आपण निसर्गाच्या नियमांनुसार किंवा राज्यघटनेनुसार वागणे अपेक्षित असताना तीनपैकी एक स्त्री कौटुंबिक हिंसेची शिकार ठरते. दर सेकंदाला कुठेना कुठे बलात्काराची नोंद होते. बालविवाह केल्या जातात. अकाली मातॄत्व लादले जाते. तिने कसे कपडे घालावे, तिने कोणता अभ्यासक्रम निवडावा हे इतर ठरवतात. कामाच्या काही ठिकाणी तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले जाते. ह्याला स्वातंत्र्य म्हणता येईल का? मुलांपेक्षा मुलींना जास्त बंधनात ठेवले जाते. याला कारण तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वा काळजीपोटी वा सामाजिक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत धोकादायक वळणावर आलेली असल्यामुळे तिला पूर्ण स्वातंत्र्य दिल्या जात नाही हे जरी खरे असले तरी एकंदरीत समाजच या आघाडीवर अपयशी ठरलेला आहे. सातच्या आत घरात हा नियम फक्त मुलींनाच लावल्या जातो. शरीरभर कपडे घातले पाहिजे ही अपेक्षा फक्त मुलींकडूनच केली जाते. तिने मुलांशी किंवा इतर पुरुषांशी बोलू नये, मैत्री ठेवू नये असे समजले जाते. आजच्या काळात तर टीम वर्क चे महत्व असताना हे कसे शक्य आहे?
काळानुसार म्हणा किंवा मुलींमध्ये शिक्षणाच्या प्रसारामुळे म्हणा मुलींना बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिल्या जात असले तरी समानरित्या स्वातंत्र्य दिल्या जात नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. घरातले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, आपले करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य, आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, मुक्त संचार, आचार, विचारांचे स्वातंत्र्य आजही तिला दिले जात नाही. घटनेमुळे ३३% म्हणा किंवा ५० % म्हणा विविध संस्थांमध्ये स्त्रियांना संधी दिल्या जाते. पण ती कागदावरची संधी ठरते. सरपंच म्हणून, कोणत्याही स्तरावर जनप्रतिनिधी म्हणून, सदस्य म्हणून जेव्हा एखादी स्त्री निवडून येते किंवा निवडल्या जाते तेव्हा त्या पदाशी संबंधित कार्य करण्याचे, निर्णय घेण्याचे तरी स्वातंत्र्य तिला मिळते काय? तिचे वडील किंवा मुलगा किंवा पती तिच्या वतीने निर्णय घेतात. हे अपेक्षितच नाही. स्त्री एक शक्ती असली तरी तिला अबला समजल्या जाते. तिला सबला होण्यासाठी घरातली स्त्री किंवा पुरूष प्रयत्न करतात का? किती कुटुंबात मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर करण्यासाठी प्रयत्न केले जातात? शिक्षणामुळे, नोकरीमुळे स्त्रिया घराबाहेर पडत आहेत, मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत तरीही त्या पूर्ण स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्या थोड्याशा मोकळ्या बोलल्या किंवा थोड्या उशिरा घरी आल्या तर बाहेरचे लोक सोडा तर तिच्याच कुटुंबातील सदस्य तिच्या चारित्र्याविषयी शंका घ्यायला सुरुवात करतात. ही गोष्ट खरी आहे की भीतीपोटी स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. स्वातंत्र्य व स्वैराचार यांमधील भेद ना स्त्रियांना कळत नाही ना पुरुषांना. बाहेर शिक्षणानिमित्ताने मुली बाहेरगावी पाठवल्या जात नाही व असंख्य प्रतिभावान मुली संधींअभावी जीवनात पुढे जात नाहीत, प्रकाशात येत नाहीत वा यशस्वी होत नाहीत. ग्रामीण भागातील मुलींना तर स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सोडले जाते, त्यांचे कमी वयात लग्न लावले जाते व व्यक्तिमत्त्व फुलवण्याच्या, विकसित करण्याच्या संधी नाकारल्या जातात. ज्या घरातील सदस्य मुलींवर पूर्ण विश्वास टाकतात, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतात त्या मुली आपले पंख पूर्ण मोकळे करून यशाच्या, विकासाच्या आकाशात विहार करतात व आपला परीघ विस्तारतात. बाकीच्या कोमेजतात, सुकतात व नष्ट होतात.
जितकी शक्ती, प्रतिभा, बुद्धीमत्ता, संवेदनशीलता, चिकाटी वा जिद्द मुलांमध्ये असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात हे गुण मुलींमध्ये असतात. परंतु त्यांना स्वातंत्र्याचे मोकळे व सुरक्षित आकाश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालकांची आहे तेवढीच ती समाजाची सुद्धा आहे. प्रगतीशील किंवा विकसित समाज तोच ज्या समाजात स्त्रियांना मोकळे विश्वास पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते, तिच्या पंखांना बळ दिले जाते, तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन दिले जाते. आपल्याला जर सुदृढ समाजाची निर्मिती करायची असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून व स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. घराघरांतून मुलींवर चांगले संस्कार केले तर त्या स्वैराचाराने वागणार नाहीत. कारण निसर्गाचा नियमच आहे की जेवढे तुम्ही दाबून ठेवणार तितक्याच वेगाने ते उसळी घेणार. मुलांवर संस्कार करण्याची जास्त गरज आहे. बाहेरील मुलींना व महिलांना तो स्वतःच्या आईबहिणीसारखा आदर देईल. मुलांना व मुलींना फक्त पैसा पुरवून वा भौतिक सुविधा पुरवून भागणार नाही तर जागरूक पालकांची भूमिका समाजाला पार पाडावी लागेल.
काही जण मुलींना स्वातंत्र्य देऊ इच्छितात पण आजकालच्या तथाकथित आधुनिक युगातील मुलींच्या फॅशन्स, त्यांचे सार्वजनिक ठिकाणी बेधुंद, बेदरकार वागणे पाहिले की अनामिक भयाने आपोआपच मुलींच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जातो. त्यामुळे ही मुलींची पण जबाबदारी आहे की त्या त्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा खराखुरा अर्थ समजावून घ्यावा व स्वातंत्र्याचा भरभरून आस्वाद घ्यावा. त्यासाठी मुलींमध्ये, मुलांमध्ये तसेच एकूणच समाजामध्येच वैचारिक प्रगल्भता आणणे तसेच कालसुसंगत चांगल्या गुणांची व विचारांची रुजवणूक करणे आजच्या काळात खूप आवश्यक झाले आहे.
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे,
अकोला जिल्हा उपाध्यक्ष, मराठी साहित्य मंडळ
मोबाईल - ७०३८२७६५५८
Post Views: 237