दोन व्यक्तींकडून उमेदवारी अर्ज मागे
Akola : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल 17 अर्जांपैकी दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानुसार निवडणुकीसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) असे दोन अर्ज आज मागे घेण्यात आले. त्यानुसार उर्वरित 15 उमेदवारांना चिन्हवाटपासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात झाली. बैठकीला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.
उमेदवारांना प्राप्त चिन्हे पुढीलप्रमाणे : अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी, कमळ), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी, प्रेशर कुकर), प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सोशल, चिन्ह- गॅस शेग़डी), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी, टीव्ही), मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना, जहाज), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी, रूम कुलर), ॲड. नजीब शेख (इंडियन नॅशनल लीग, गॅस सिलेंडर), अशोक किसन थोरात (अपक्ष, रोडरोलर), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस घेतलेला शेतकरी). दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष, नारळाची बाग). धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष, हिरा), चिन्हवाटपानंतर सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व नियम आदी माहिती व साहित्य पुरविण्यात आले. यावेळी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आचारसंहितेशी संबंधित सर्व बाबींची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उमेदवार खर्च व्यवस्थापन नोडल अधिकारी योगेश धोंगडे यांनी सादर करावयाचा लेखा विवरण, नोंदवही आदी माहिती दिली.
सामान्य निवडणूक अधिकारी रामप्रतापसिंग जाडोन यांनी उमेदवारांशी संवाद साधून निवडणूकीशी संबंधित कुठलीही बाब निदर्शनास आणून द्यावयाची झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यांचा संपर्क क्रमांक 8626058320 आणि दूरध्वनी क्रमांक (0724) 2991067 हा आहे. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांना निवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास ते शासकीय विश्रामगृह येथील गुलमोहर कक्ष येथे सकाळी ९ ते १० या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असतील.
Post Views: 113