व्यसनाधिन तरूणाने डोक्यात दगड घालून पत्नीला संपवले
बाळापूर तालूक्यातील निंबा येथील भिषण घटना
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-03-30
निंबा - व्यसनाधिन दारूड्या पतीने दारूच्या नशेत छतावर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला कायमचे संपविण्याची भिषण घटना बाळापूर तालूक्यातील निंबा येथे घडली. सौ.वंदना तानाजी तायडे असे मृतक पत्नीचे नाव असून याप्रकरणी आरोपी तानाजी शालिग्राम तायडे याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उर्फ उर्फ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात निंबा येथे सदर पती ,पत्नी आणि त्यांची तीन मुले असे कुटूंब राहत होते.आरोपी पती तानाजी हा सुरूवातीला एक शांत स्वभावाचा युवक होता.परंतू पुढे त्याला दारूचे जबर व्यसन जडल्याने तो सतत पत्नी वंदनाला त्रास देऊन मारहाण करीत होता.त्याच्या त्रासाला कंटाळून ती चार वर्षांपासून पूणे येथे राहत होती.आरोपी पतीने तिला निंबा येथे येण्याची विनवणी केली होती.परंतू तिने त्यालाच पूणे येथे बोलावून घेतले होते.काही काळ सुरळीत गेल्यानंतर आरोपी पून्हा दारू पिऊन त्रास देणे सुरू झाले.या दरम्यान त्यांच्या मुलाचे लग्न जुळल्याने लग्नाचे कापड घेण्यासाठी हे कुटूंब निंबा येथे आले होते.
त्यानंतर वंदना व तिची मुलगी शारदा निंबा येथे थांबले व काही दिवसांनी आरोपी तानाजी हा आपल्या दोन मुलांसह पुणे येथे गेला.परंतू तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून तो २८ मार्च रोजी परत निंबा येथे आला होता.त्याच रात्री वंदना आणि तिची मुलगी घराच्या छतावर झोपले असता २९ मार्चच्या रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी तानाजीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घातला.यामध्ये वंदना गंभीर जखमी झाली . निंबा येथील डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली तिला तातडीने अकोला सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. फिर्यादी शारदा तायडे हिच्या तक्रारीनुसार उयळ पोलिसांनी आरोपी पतीवर खूनाचा गुन्हा दाखल केला.तो हिंगणा येथील जंगलात पळून गेल्याच्या माहितीनुसार ठाणेदार गोपाल ढोले यांचे मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ तासांत उरळ पोलिसांनी त्याला अटक केली.
Post Views: 910