अकोला : शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अकोला आणि महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला द्वारा संपादित मोर्णातीरी काव्यधारा या अकोला जिल्ह्यातील शिक्षकांच्या कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधिक कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा नोएल स्कूल अकोला येथे संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पुष्पराज गावंडे (सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई) लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे; डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक); सुरेखा मनवर, अनोश मनवर; अनुल मनवर आणि अर्पणा डोंगरे लाभले होते. यावेळी डॉ. संतोष पेठे आणि प्रेमदास राठोड यांची उपस्थिती होती.
शिक्षण विभाग माध्यमिक द्वारा मोर्णातीरी काव्यधारा भाग एक या कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यात सादर झालेल्या निवडक कवितांचा प्रतिनिधी कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. कवितासंग्रहाचे प्रकाशन परीस प्रकाशन पुणे यांनी केले असून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शुभेच्छा संदेश या संग्रहाला मिळाले आहेत. कवितासंग्रहात मराठी आणि हिंदी भाषांमधील ८७ कवितांचा समावेश असून यात गझल गीत अभंग छंदमुक्त काव्य अशा विविध काव्य प्रकारांचा समावेश आहे. बबलू तायडे आणि निलेश कवडे यांनी रचलेल्या अकोला जिल्ह्याच्या गौरव करणाऱ्या गीतांचा समावेश या कवितासंग्रहामध्ये केला आहे हे विशेष...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी मोर्णातीरी काव्यधारा चे साहित्यिक मूल्य विशद करून यामध्ये समाविष्ट कवितांच्या दर्जावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पुष्पराज गावंडे यांनी बोली भाषेचा वैदर्भीय समाजावर असलेला प्रभाव रंजक पद्धतीने कथन केला. अर्पणा डोंगरे यांनी आपल्या मनोगतात ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास होत नाही, यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावाच लागतो असे विचार प्रकट केले. प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन निलेश कवडे यांनी केले. त्यांनी सूत्रसंचालन करताना मो मोर्णा नदी आणि अकोला हा जिव्हाळ्याचा संबंध ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देऊन उलगडून दाखवला. प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन प्रेमदास राठोड यांनी केले. मोर्णातीरी काव्यधारा कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर जिल्ह्यातील शिक्षक कवींचे कवी संमेलन संपन्न झाले. यात सुमारे ६० शिक्षक कवींनी सहभाग घेतला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अलका बोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष पेठे यांनी केले
Post Views: 284