विद्यार्थी वर्गासाठी देशपातळीवरील पोस्टकार्ड लेखन स्पर्धा.
देश:- केंद्रीय पातळीवर आझादीका अमृत महोत्सव साजरा करताना खास ७५ वर्षाचे निमित्ताने डाक विभागाने देशपातळीवर शालेय विद्यार्थीवर्गासाठी पोस्टकार्ड लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करताना प्रधानमंत्र्यांना ७५ लाख पोस्टकार्ड पाठवण्याचे उद्दिष्ट यासाठी ठरविण्यात आले असले, तरी यामुळे पोस्टकार्ड हे पत्राचे मूळ स्वरूप लहान, कुमार, तरुण विद्यार्थ्यांनी पोहचवण्याचा मानस डाक विभागाला यातून साध्य करायचा आहे.
पोस्टकार्ड म्हणजे खूप कमी मजकूर राहणारे खुलेपत्र. त्यामुळे हे पत्र लिहताना लिहणाऱ्याला फाफटपसारा न लिहता मोजक्या शब्दात आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे हे कसब या पत्र लेखनात पाळावे लागते. ही पोस्टकार्ड लेखन स्पर्धा म्हणजे स्पर्धकाने आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे छोटेखानी पत्र लिहायचे आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता ४ थी ते १२ वी मधील स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहेत. यामध्ये सी.बी.एस.ई,राज्य परीक्षा बोर्ड,नवोदय विद्यालय,या शाळांचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील.तसे आदेश केन्द्रीय शिक्षण विभागाने या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेले आहेत.
पत्राचे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी कितीही पत्र पाठवू शकणार आहे. या पत्रलेखनासाठी २०४७ सालातील मला अपेक्षित भारत (My Vision for India in 2047) आणि प्रसिद्धी न मिळालेले माहित नसलेले स्वातंत्र्यसेनानी ( Unsung heroes of freedom struggle ) असे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. वैशिष्टपूर्ण आकर्षक असणारी पोस्टकार्ड www.innovativeindia.mygov.in/postcardcampaign या वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रधानमंत्र्यांचा पत्ता आणि आझादीका अमृतमहोत्सवाचा लोगो असलेली पोस्टकार्ड पोस्टऑफिस मधून उपलब्ध करून दिली जात आहेत. ही सर्व पोस्टकार्ड आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसद्वारे मुख्यडाकघराकडून प्रधानमंत्री कार्यालयाला दररोज पाठवली जाणार आहेत. स्पर्धेची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२१ ही राहणार आहे. याची अधिक माहिती डाक विभागाकडून प्राप्त करून घेता येईल.आलेल्या पत्रातून सर्वात उत्कृष्ट ७५ पोस्टकार्डाची निवड प्रधानमंत्री करणार असून त्यांची नोंद घेतली जाणार आहे. सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन ह्या देशभक्तीच्या अमृतमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन अकोला डाक विभागाचे प्रवर अधिक्षक श्री.संजय आखाडे यांनी केले आहे.
Post Views: 280