नावात राम आचरणात बेकाम... महाराष्ट्र संस्कृतीशी खेळणारांच्या ह्या मतलबी हुशाऱ्या..! : संजय एम.देशमुख,ज्येष्ठ पत्रकार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Dec 2022, 8:50 AM
   

          भात्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नसतो.एकदा सुटला की सुटला, तो सुसाटपणे दिशा शोधतो.त्याला जर थांबवून परत आणता आलं असतं,तर मी असं बोललोच नाही.मला बदनाम करण्यासाठी माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला.असा निर्लज्ज  शहाजोगपणा करण्याची लोकांना सतत फसवणाऱ्या ढोंगी बुवाबाबांना आणि राजकारण्यांना आवश्यकता पडली नसती.लगेच वापरलेली अख्खीच्या अख्खी वाक्ये सोयीनुसार नि:ष्प्रभ करून आपल्या भात्यात परत लपवून ठेवता आली असती.परंतू सृष्टीने अनेक गोष्टींचे नियंत्रण स्वतःकडे ठेऊन मानवाला पराधिन ठेवल्याने नाईलाजास्तव त्याला काही अंशी तरी माणसात रहावे लागले.अन्यथा अधिक उन्मत्त आणि माजोरी होऊन नावात राम,रहिम,अन्यथा कोणतीही पवित्र नांवे असल्यावरही त्यांना कर्म आणि मानवता धर्माने ती सार्थक करण्याची कोणती गरज वाटली नसती.त्यामुळे अनेक राम शब्दांचा अवमान होऊन जीवनातले मानव दानवांमध्ये उत्क्रांत झाले असते.  
          बळी तो कान पिळी या न्यायाने  सत्ता, अधिकार आणि या दगलबाजांना खोट्या प्रसिध्दी तून मिळत गेलेले मोठेपण किती अहंकारी, फालतू आणि बकवासवीर बनवू शकते याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. याचा प्रत्यय येण्याचे प्रमाण सन २०१४ पासून बेफाम वाढलेले असून संस्कृती,सभ्यता, आणि वीरांच्या  पराक्रमांनी स्वातंत्र्याचा इतिहास जेथे लिहल्या गेला, तिथेच या भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.नव्हे खोट्या राज्यकर्त्यांना सत्ता मिळवून देण्यात मदत केल्याने अशी भुंकणारी ही भटकी  कुत्री महाराष्ट्रातच सोडण्यात आलीत. छत्रपतींच्या पराक्रमाने मनामनात ज्वलंत निष्ठा आणि नसानसांमध्ये येथे शौर्याचे रक्त अजून जीवंत आहे.तरीही त्या महाराष्ट्रातच जर अजूनही कुणी नारीशक्तीचा अपमान आणि महापुरूषांच्या आदर्शांना गालबोट लाऊन विटंबना करीत असेल,तर त्यांना मराठ्यांच्या इतिहासात जरा डोकावून बघावे लागेल. त्यांना आणि त्यांना सांभाळणाऱ्या मतलबी सत्ताधाऱ्यांना या विद्रोहाचे महाराष्ट्रातील केंद्रबिंदु हटवता येत नसतील तर उठाव होऊन परत इतिहास घडू शकेल.म्हणून आपण,आपली सत्ता,वर्चस्व अबाधित आहे, आपले कोणी काहीही बिघडवू शकत नाही, अशी अधोगतीच्या मार्गाने नेणारी  दिवास्वप्ने  स्वतःला उन्मत्त अनाजीपंत समजून कुणी पाहू नयेत.
     अहो ! महाराष्ट्राला आणि येथील जनतेला तुम्ही या मानवता आणि समाजनिष्ठेची लायकी  नसलेल्या दुष्कर्मी राज्यकर्त्यांच्या मदतीने अक्षरस: लुटताय....! बाजारपेठेत लोकांना फसवून स्वतःचे साम्राज्य उभे करताय....! मग तुम्हाला ओसरीत प्रवेश दिला म्हणून स्वतःलाच सर्वाधिकारी समजून येथील बाया बापड्यांच्या इभ्रतीवरच हात घालण्याचा प्रयत्न करताय ? कोण रामदेव काय रामदेव? स्वत:च्या नावात देव आणि रामाचा साज कोंदून भारतातील जनतेला लुटणारा परजीवी दलाल माणूस? संन्यस्तपणा हे काय नुसते ढोंग वठवण्यासाठीची खोटी शाळा आहे का ? मग एखादा संन्याशी झाला म्हणून त्यांची नजर आणि बोलणे बिघडले असं म्हणावं लागेल.संन्यस्यत्वाकडे जाणारा माणूस हा जीवनातील अंतिम सत्त्याकडे‌ जाणारा,वाणीवर नियंत्रण मिळवणारा ,ज्ञानी महापुरूष असतो असं धर्मग्रंथही सांगतात.मग अशा ज्ञानवंताला आपण महिलांबध्दल काय बोलावे आणि काय बोलू नये हे न समजण्याईतका निर्बुध्दपणा येतो तरी कसा.....? या मार्गावरून जाणाऱ्यांचे उदात्त जीवन इतरांचे आदर्श असतात.मग असे मानसिक संतुलन ढळल्याप्रमाणे गल्ली गल्लीतून फिरून असंबद्ध वाचाळता प्रतिध्वनित करणाऱ्यांना योगमार्गावरील दुर्दैवी पथभ्रष्ट म्हणावे लागेल.तसं जर असेल तर अशा लोकांपासून येथील निरोगी समाजव्यवस्था धोक्यात येऊ शकते.
                  जीवनात एखाद्यावेळी झालेल्या चुकीला चुक समजल्या जाते.परंतू तिच गोष्ट वारंवार होत असेल तर तो हेतूपुरस्सरपणे स्वत:च्या पदाच्या सुरक्षेसाठी, कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन‌ जनभावना भडकावण्यासाठी केलेला कंत्राटी आगाऊपणा ठरतो.नव्हे अशा घटनेमागे काहींना काही कारणे ही असतातच असतात.त्यामुळेच उठसुठ महापुरूष आणि क्रांतीकारकांच्या अब्रूचा भाजीपाला करून इतिहासावर आघात करणारी आभासी पिल्लं सोडत राहणे हे प्रकार या महाराष्ट्रात भाजपच्या राजवटीपासूनच सुरू झालेली आहेत.भिड्यांसारखे बेअक्कल भिडू भाजप नेत्यांनीच  येथे भिडवलेले आहेत.काही दारूड्या नट नट्याही सगळी यांचीच विकाऊ प्यादी आहेत.त्यांना वेळोवेळी कसं संरक्षित केल्या गेलं हे उभ्या महाराष्ट्रानेही पाहिलेलं आहे.असं जर नसतं तर भाजपकडून चाकरीच्या  बक्षीसात पद घेऊन महाराष्ट्रात येणाऱ्या कोशारीच्या हूशारीने‌ सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं नसतं.शैक्षणिक क्रांती करून समाजाला सर्वांगीण प्रगतीचा प्रकाश‌ दाखविणाऱ्या फुले दांपत्याची बदनामी, ईतिहासाची कवडीचीही माहिती नसल्यावर, अक्कल नसतांना सरळ सरळ मनामनातल्या रयतेच्या राज्यालाच खूजा ठरवण्याचा प्रयत्न ...! एवढ्यावरच हा माणूस थांबला नाही,सुधारला नाही तरीही क्रांतिकारकांच्या स्मृतीस्थळावर चप्पल घालून गेलाच....!मग याला मतीमंदांकडून वारंवार घडत जाणाऱ्या चुका असे नाव देऊन गप्प बसावे का? ही गोष्ट  महाराष्ट्रातील भाजपचे एकमात्र मसिहा देवेन्द्रजींना आणि आता केंद्रातील नेत्यांना जनतेने विचारले पाहिजेत.
         कॉंग्रेसला सत्तेतून घालवण्यासाठी देशतारक योगगुरू म्हणून अवतरलेले रामदेवही‌ मैदानात माकड उड्या मारून डोळे मिचकावित रामलीला करत होते.त्या दलालीच्या रूपात पतंजली गब्बर झाली आणि यांच्या पापांनी जनता मात्र कंगाल झाली....! तिकडे स्वत:ला आधुनिक गांधी समजणाऱ्या  अन्नांच्या मुर्खपणामुळे केजरीवाल वरचढ ठरले.....मैदानावर तडपणारे अण्णा मात्र घरात आणि मंदिरात आता झोपा काढतात.आमच्यासारखे भेटायला गेलेत तर कड्या लावून घेतात आणि आतून सांगतात "त्यांना जायला सांगा, मी भेटणार नाही,माझी तब्येत बरी नाही".कारण आता पत्रकारांनी आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची त्यांची तयारी नाही. आम्ही कार्ड आत नाही दिलं,कितीही लपवलं तरी ते ओळखतात की पत्रकारच असतील. हा आमचा भेटीसाठी तिन तास खर्च केल्यानंतरचा स्वानुभव आहे....उभ्या आयुष्यात आपण किती खोटी मतलबी आणि दुटप्पी कामं केलीत याच्या जाणीवा या लोकांना मरता मरता वेदना देऊन जाणार आहेत.नियती यांच्या माणूसपणाबध्दल यांना नाही नाही ते प्रश्न विचारणार आहे.तिच गत या देशातील दुष्कर्मी राजकारण्यांची एकदिवस होणार आहे.
          पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळून जाणारे तिच्या कचाट्यातून मात्र सुटू शकणार नाहीत.कारण उभी हयात सर्वसामान्यांची लूट आणि आयुष्ये क्लेशमय करण्यात ज्यांनी खर्ची घातली,समाजातील माणसा माणसाशी कर्तव्यधर्मात प्रतारणा केली. याचे उपहार अशा अमानवीय लोकांना काय दिले जावेत.अण्णांना तरी गांधीवादाचा स्पर्श आहे म्हणून आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना आतून खंत तरी आहे. परंतू "रामनाम जपना,पराया माल अपना" हे सुत्र अवलंबत स्वत:ला वैश्विक योगगुरू समजून बाबा रामदेव मात्र त्यांच्या ऐश्वर्यात मग्शूल आहेत.सलवार कुर्त्यावर नामर्दाप्रमाणे पळ काढणाऱ्या आपल्या सारख्यांमुळेच या देशाचं वाटोळं झालं.जनसामान्न्यांच्या जीवनात कोणताही बदल झाला नाही.महागाईपासून तर काळ्या धनापर्यंत आपण नुसते बोंबलत होतो. आता पत्रकारांनी ही उर्मटपणा करतो आहे.आपले सर्व फंडे फालतू मतलबी आणि देशातील जनतेशी गद्दारी करणारे होते. याची उपरती मात्र रामदेवांचा अजूनही होत नाही.असा निगरगठ्ठ योगी भारतात या आधी कधी जन्मालाच आलेला नसावा. वरून अजून सत्ताश्रय आणि धनाच्या बळावर उन्मत्त होऊन जीभ घसरवून देशातल्या महिलांबध्दलही असभ्य बोलण्याची हिंमत दाखविणारे आचरण योगी होण्याच्या पात्रतेचे निश्चितच नाहीत,तर भोगीपणाची लक्षणं दाखविणारी आहेत.
        नावात राम आणि आचरणात मात्र बेकाम, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी खेळणारांच्या ह्या मतलबी हूशाऱ्या अशा या कोशारी, रामदेवांचा या मर्कटलिलांना पायबंद घालण्यासाठी,त्यांना संरक्षित करणाऱ्या अनैतिक राजकारण्यांना हद्दपार करून, त्यांच्या पापांची प्रायश्चित्तं देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती घडली पाहिजे.न्यायव्यवस्थेच्या दरबारी जाण्यापूर्वी जनतेची न्यायालये किती कडक आणि चोख प्रत्युत्तर देणारी असतात हे अशा फालतू लोकांना वेळीच कळलं पाहिजे....!
संजय एम.देशमुख,ज्येष्ठ पत्रकार 
मोबा. क्र ९८८१३०४५४६ 

    Post Views:  274


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व