मृत शेतकर्‍यांची माहितीच नाही म्हणणारे असंवेदनशील सरकार! : संजय एम. देशमुख


 संजय देशमुख  02 Dec 2021, 2:24 PM
   

संपूर्ण देश समस्यांच्या विदारक उंबरठ्यावर उभा असताना, देशातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, श्रमिक, बेरोजगार वेदनांच्या आर्त किंकाळ्या फोडत असताना, राज्यकर्त्यांनी कमालीची बेफिकीरी दाखवून आपल्या हेकेखोरीनेच राजसिंहासनात निष्क्रियपणे आनंद साजरा करावा, अशा असंवेदनशील राज्यकर्त्यांना राजेपणाच्या कोणत्या व्याख्येत बसवावे? प्रजेच्या सुखासाठी, कल्याणासाठी विश्वास टाकून ज्यांच्या हातात राज्यकारभाराची सुत्रे दिली, त्यांना देशात समस्यांचे वणवे पेटलेले असताना ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आणि राजेपणाच्या कर्तव्याने शमविण्याऐवजी जखमांवर मिठ चोळून अधिक भडकविणे ही वाटचाल देशाच्या प्रगतीसाठी विनाशाच्या दिशेने नेणारी ठरते. जनतेच्या वेदनांची तमा न बाळगता स्वतःच्या वर्चस्वासाठी आणि राजसिंहासन सुरक्षित ठेवण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेले राज्यकर्ते देश आणि जनतेचे कल्याण साधणारे ठरत नाहीत. तर त्यांच्या हालअपेष्टांची दखल न घेणारे बेजबाबदार वृत्तीचे, माणसाच्या व्याख्येतही न बसू शकणारे भावनाशुन्य बेजबाबदार घटक ठरू शकतात! 
कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. अत्यंत हालअपेष्टांना तोंड देत स्वाभिमानी आणि पराक्रमी शेतकर्‍यांनी दिल्लीत ठाण मांडून मोदी आणि केंद्र सरकारला नमविण्यात अखेर यश मिळविले. परंतू तोपर्यंत त्यांना देण्यात आलेल्या अमानविय वागणुकींची, आंदोलन तोडण्यासाठी करण्यात आलेल्या नानाविध अनैतिक प्रयत्नांची, आणि त्यात बळी गेलेल्या शेतकर्‍यांची बलिदानांची मात्र इतिहासात नोंद राहील. या देशातील शेतकरी, श्रमिक आणि सरकार विरोधात आपल्या आईबापांचे बळी जातांना उघड्या डोळ्यांनी पाहणारा युवक-बेरोजगार हे कौर्य कधीही विसरू शकणार नाही. शेतकरी अन्यायाविरूद्ध आंदोलनात केलेल्या देह त्यागाच्या ह्या भळभत्या जखमा, ते ऐतिहासिक दुर्दैवी क्षण हृदयात साठवूनच हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आपली भविष्यातील वाटचाल ठरविणार आहेत. 
केंद्र सरकारने ‘देशाच्या हितासाठी’ हे गोंडस शब्द वापरून कृषी कायदे रद्द केले. परंतू त्याशिवाय शेतकर्‍यांच्या असलेल्या मागण्यांचा विचार मात्र केला नाही. त्यानंतर या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकर्‍यांबाबत काल लोकसभेत केलेले वक्तव्य अत्यंत संतापजनक असून पाषाण हृदयी सरकारच्या, कठोर वृत्तीचा परिचय करून देणारे आहे. या शेतकरी आंदोलनात किती शेतकर्‍यांचा मृत्यू झाला याची माहितीच आमच्याकडे नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या मतांवर मोठेपणा मिरवणार्‍या सरकारने दिले आहे. सत्तेचे ऐशोरामी लोकप्रतिनिधी पद मिळविणार्‍या अमानविय वृत्तीच्या केंद्र सरकारने अशी थट्टा करणारी उत्तरे द्यावीत, ही या देशातील लोकशाहीची भिषण शोकांतिका आहे. 
आंदोलन फोडण्यासाठी पोलिस बळांचा वापर करून, शेतकर्‍यांच्या मार्गात खिळे ठोकून त्यांना जीवंतपणी सुळावर चढविण्याचे प्रयत्न करणार्‍या निगरगठ्ठ केंद्र सरकारला, त्यांचे मृत्यू ह्या शुल्लक गोष्टी वाटतात. त्यांना पायाखाली रगडल्या जाणार्‍या किड्या-किटकुलासमान देशातील अन्नदात्यांचे जीव वाटतात. म्हणूनच या आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची माहिती आमच्याकडे नाही, असे अत्यंत निर्लज्ज स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलेले आहे. किती लोक मेलेत, यांच्या नोंदी सरकारच्या इशार्‍यावर नाचणार्‍या पोलिस आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनीच केलेल्या  नाहीत, असे तर या संविधानावर चालणार्‍या लोकशाहीप्रधान देशात कधी घडू शकणार नाही. मग केंद्रसरकारचे हे बेजबाबदार बालिश स्पष्टीकरण, याला हास्यास्पद हा शब्द तर वापरता येणारच नाही. मग बुडतीचे पाय खोलाकडे जाणार्‍या अविवेकी, असंवेदनशील राज्यकर्त्यांचे हे एक दुर्दैवी आणि दुःखदायक आणि केवढे संतापजनक वक्तव्य आहे, याचा विचार देशातील जनतेने वेळीच केला पाहिजे. 
आंदोलनातील शेतकरी नेत्यांनी आंदोलनात 700 शेतकरी मृत्यू पावल्याचा दावा केला आहे. यासंबंधी मृत्यू पावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदती देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला का? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर दिले गेलेले स्पष्टीकरण अत्यंत थक्क करणारे आहे. मरण पावलेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूच्या कोणत्याही नोंदी सरकारकडे उपलब्ध नाहीत, असे उत्तर देण्यात आले. धर्म, पंथ, जात-पात यावर मोठ्या आवेशात गळे फाडणार्‍या सरकाकरडे लोकांना घाबरवण्यासाठी अद्यायावत आणि खोटेपणाच्या अनेक आकडेवार्‍या तयार असतात. मात्र आपल्या न्याय मागण्यांसाठी, हक्कांसाठी सरकारच्या दमदाटी आणि अन्यायाला तोंड देत, प्रसंगी पोलिसी बळाच्या वापरात जीव गमावणार्‍या अन्नदात्यांच्या जीवांची पर्वा या सरकारला नाही, हेच या सर्व वक्तव्यामधून सिद्ध होते आहे. हक्कांकरीता झगडणार्‍यांचे जसे जीव जातात तसेच राजकारण्यांच्या महत्वाकांक्षा सिद्ध करण्याकरीता मंदिर, मस्जिद आणि धर्म, पथांच्या गदारोळांमध्येही अनेक निरपराध्यांचे आयुष्य डावावर लावण्याचे खेळ या देशातील राजकारणी सातत्याने खेळत आहेत. तरीही निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या अच्छे दिनांच्या स्वप्नांना, चुनावी जमुल्यांना बळी पडून त्यांचे पापी कारनामे विसरून त्यांनाच परत आपल्या छाताडावर बसविण्याची अविवेकी वाटचाल आज देशातील मतदार राजा करीत आहे. प्रसंगी स्वतःला भिकारी बनवून अपात्र कुरकर्म्यांना सत्तेच्या ऐशोरामाची  राजसिंहासने बहाल करण्याचा मतदारांचा मुर्खपणा हेच देशातील राजकीय नेत्यांचे परमभाग्य ठरत आहे. परंतू काळ हा सर्वात मोठा न्यायाधिश आहे. शेवटी निवाडा हा त्याच्याच कोर्टात होणार, ही गोष्ट अमानविय वृत्तीच्या पाषाणहृदयी राजकारण्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. जर ठेवली नाही तर या बुडत्यांचे पाय खोलाकडेच जाणार हे मात्र निश्चित!

    Post Views:  360


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व