महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Jan 2024, 9:35 AM
   

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले आहे. वंचितला आघाडीत सामील करून घेण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आधीच सकारात्मक होते, मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसकडूनही याला संमती मिळाल्यानंतर याविषयीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांबरोबरच वंचित आघाडीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

आघाडीत सामील होणार
वंचितच्या प्रदेश उपाध्यक्षांना बैठकीत योग्य सन्मान मिळाला नाही. त्याचप्रमाणे आघाडीत सामील करून घेण्याबाबतच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नाना पटोले यांना आहेत का? याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून पत्र दिलेले नाही, तरीही भाजपचा पराभव हीच आमची प्राथमिकता असल्याने मविआत सामील होऊ.
प्रकाश आंबेडकर
अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार 
 वंचितच्या समावेशामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे. येत्या २ फेब्रुवारीला आघाडीची बैठक होणार असून या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहे. वंचितसह सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्षांचा आघाडीत समावेश झाला आहे.
   - संजय राऊत, शिवसेना नेते

- वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हेही या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मध्येच बैठकीतून बाहेर काढल्याचा दावा पुंडकर यांनी केला. वंचितचा अजेंडा आपणच सर्वांसमोर ठेवला. मात्र, त्यानंतर आपल्याला १ तास बाहेर ठेवण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 
nखा. संजय राऊत यांनी मात्र याचा इन्कार केला. बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे तीन प्रतिनिधी सहभागी झाले होते. या तीनही प्रतिनिधींनी आमच्यासोबत चर्चा केली, शिवाय एकत्र भोजनही घेतले. त्यामुळे अपमानास्पद वागणूक दिल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे राऊत म्हणाले.

    Post Views:  160


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व