प्रेम... जिव्हाळा... काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय…


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Feb 2023, 10:30 AM
   

(स्वप्निल देशमुख) : सहजच…
दुसऱ्या साठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं..अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.पण प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो..कोणताही स्वार्थ नसतांना.. मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्या साठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो..यांचं कर्तव्ये च आहेत..
करणाऱ्या चा हेतू स्वच्छ असतो.. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो..गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो…
ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदार पणे गोष्टी हाताळतो…ज्याला समजून उमजुन घायचंच नाही तो शब्दाचा किस पडतो…शब्दांनी घायाळ करतो…नात्यांची खरी मेख तर इथेच आहे…माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो..घालून पाडून बोलतो..परिणाम फक्त वाईटच होतात…संबंध दुरावले जातात..आपुलकीतला रस संपत जातो…उरते ती फक्त निराशा…
हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..जणू पैसा म्हणजे सर्वस्व…अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग…रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग…एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणुन राग…निर्व्याज प्रेम ..जिव्हाळा..काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय … 
   खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार याची काहीच शाश्वती नाही..सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही..जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी साठी रागावतात पण परत माया करतात..त्यांचा विसर कधीच पडु देऊ नये..कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही..हा समजूतदार पणा अंगी यायला हवा..
जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत..तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..दुसऱ्या ला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे…आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही…मिळेल ते अनुभव ..मिळेल ती उपेक्षा ..मिळेल ते प्रेम…आदर..मिळेल ती अनुभूती घ्यावी… प्रवाहात मुक्त जगावं..जीवनात सगळेच रंग हवेत…निराशेतही आशा आहेच की…त्या ऊर्जेची वाट बघायची..
कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशीवाय…कौतुक करणार..पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना….आपल्या दुःखा च्या प्रसंगी कोणच्या डोळ्यात अश्रू येणारी… आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभवती… नाहीतर यश ..पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी तरी त्या सारखा दरिद्री तोच…खरं ना..??

    Post Views:  133


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व