हर घर तिरंगा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन
अमरावती,दि. ३० : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर
हर घर तिरंगा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातस्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३ १५ ऑगस्ट या कालावधीसाठी हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरीता या उपक्रमामध्ये सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे व ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरीव जनजागृती करावी. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालये, आस्थापना, नागरिक, संस्था यांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे. अधिकाधिक लोकसहभाग मिळवून उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्टे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
*अशी आहे ध्वजसंहिता*
ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी.
तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.
राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.
ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.
राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात घरोघरी ध्वज फडकावा व ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Post Views: 228