तात्विक मतभेद निकोप पत्रकारितेला घातक - प्रकाश पोहरे
* देशोन्नतीचे दिवाळीनिमित्त स्नेहभोजन; पत्रकारांची मांदियाळी * दुरावलेल्यांचे घडविले मनोमिलन * एकसंघ
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
04 Nov 2022, 5:27 PM
अकोला : तात्विक मदभेदातून पत्रकारांत वाढत असलेली दुही, अनाहृतपणे वाढत असलेला एकमेकांबद्दलाचा आकस, एकमेकांचे काढण्यात येत असलेले उणे-दुणे, क्षुल्लक कारणांवरुन अबोला, संवादाचे दरवाजे बंद आणि त्यातून वाढत असलेल्या कटूतेमुळे फुटीच्या प्रवाहात एकमेकांवर चालणारी लेखणी, सुजान मातब्बरही या फूटीच्या प्रवाहाचे बनत असलेले उगमस्थान या बाबी निकोप पत्रकारितेला घातक आहेत. हा फूटीचा प्रवाह संवादातून थांबवू शकतो. एकमेकांबद्दलचे गैरसमज बदलू शकतो. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करु शकतो. यासाठी सामंजस्यपणाची गरज असून, एका निकोप पत्रकारितेतून लोकशाहीचा खिळखिळा होत असलेला चौथा स्तंभ भक्कम करु शकतो, असे प्रतिपादन देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी येथे केले. दिवाळीनिमित्त वेदनंदिनी अॅग्रो टुरिझममध्ये दिवाळीनिमित्त रविवारी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनप्रसंगी ते पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.पत्रकारिता जगतात पत्रकारांची एकजूट करण्याच्या दिशेने बहुदा हा पहिलाच उपक्रम असावा. त्यामुळे यावेळी टुरिझममध्ये पत्रकारांची मांदियाळी होती.
मायबोली साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अनंत खेळकर, जिल्हा पत्रकार संघ यांच्या पुढाकारातून देशोन्नतीने स्नेहभोजनाच्या मेजवाणीतून पत्रकारांचे स्नेहमिलनही घडवून आणले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश पोहरे यांनी हल्ली बदलत असलेल्या पत्रकारांच्या भूमिकेबद्दल तसेच आपसातील किल्मीशामुळे त्यांच्या भरकटत असलेल्या लेखणीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो. व्यवस्थेवर तुटून पडत जनसामान्यांना न्याय देण्याचा त्यांचा वसा आहे. परंतु, अलिकडे पत्रकार हा वसा विसरत असून, आपसातच दुहीची बीजे रोवत आहे. ही बाब चिंतनीय तसेच एकसंघ पत्रकारितेवर आघात करणारी असल्याचे पोहरे म्हणाले. संवाद तुटू नये, तो सातत्याने साधवा जावा, यातून मनातील एकमेकांबद्दल पडलेली अढी निश्चित निघू शकते. स्नेहभोजनाचा सोहळा त्यासाठीच आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अॅड. अनंत खेळकर, जिल्हा पत्रकार संघाचे शौकतअली मीरसाहेब, अ.भा. मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अशोक पोहरे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,पुरूषोत्तम आवारे, अॅड. सुधाकर खुमकर, राजेश राजोरे, प्रा. मधु जाधव, बहुजन पत्रकार संघाचे अनिल माहोरे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,उपाध्यक्ष विवेक मेतकर,सागर लोडम, संदिप देशमुख, दै.सुपर भारतचे डॉ.संजय चव्हाण, विठ्ठल महल्ले तसेच राजरत्न शिरसाट, राजेश शेगोकार, उमेश अलोणे, जयेश जगड, अॅड. निलीमा शिंगणे, वंदना शिंगणे, नीलेश जोशी, प्रबोध देशपांडे, संजय चक्रनारायण यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार, प्रींट मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीयाचे प्रतिनिधींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या संवादरूपी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अनंत खेळकर यांनी केले. सुत्रसंत्रालन शौकतअली मीरसाहेब तसेच राजेश राजारे यांनी केले.
Post Views: 197