माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2022, 6:01 PM
   

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे झटताना दिसत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. सध्या शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू असून पक्षात प्रवेशही होत आहेत. आता, मुंबईतील माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा एका खासदाराने केला आहे. त्यातच, काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

काँग्रेस नेते असलेल्या राम पंडागळे यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोपही केले होते. दलित अत्याचारांमागे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी केलाय. खैरलांजी प्रकरणी आपला आवाज दाबण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर, २०१९ च्या निवडणुकांवेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंडागळे हे दलित समजााचे नेते असून ते विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. आज, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 

मराठा समाजातील कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची आणि त्यांना जीवे मारण्याती धमकी मिळाल्याची बातमी, काल राज्यभर पसरल्यानंतर आता राज्यभरातील मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन संरक्षण देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यावर त्यांच्या संरक्षणासाठी राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ बैठका घेतल्या आणि मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटून संरक्षण देण्याचा निर्णय मराठा कार्यकर्त्यांनी घेतला होता.

    Post Views:  153


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व