महिलाश्रम हायस्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Sep 2022, 10:02 AM
   

पुणे -   साहित्य, कलासह अनेक क्षेत्रात हिंदी भाषा सर्व देश बांधवांना जोडण्याचे कार्य करते. अशा या भाषेचे संवर्धन व विकास व्हावा. यासाठी देशभरात 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे मध्ये राष्ट्रीय हिंदी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष व उपमुख्याध्यापक विष्णू मोरे, प्राचार्या शोभा कांबळे, हिंदी विभाग प्रमुख शीतल जावळे, शिक्षक वर्षाराणी शिंदे, पल्लवी अभंग, शीतल निकम, आरती कांडलकर, सदाशिव देशपांडे आदी उपस्थित होते. हिंदी दिनानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा, कहानी लेखन, घोषवाक्य स्पर्धा, पपेट शो, भाषण, समूहगीत स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिंदी भाषेत पारंगत होण्यासाठी विद्यार्थिनींनी संत कबीर,सूरदास, तुलसीदास, मीराबाई, महादेवी वर्मा या हिंदीतून लेखन केलेल्या संत व साहित्यिकांची पुस्तके व मुंशी प्रेमचंद यांचे उपन्यास प्राधान्याने वाचावेत. हिंदी भाषा समृद्ध व सशक्त बनवण्यासह हिंदीचा प्रचार व प्रसार करून भाषा विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विष्णू मोरे यांनी केले.
प्राचार्या शोभा कांबळे यांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून स्वरचित कविता सादर करून विद्यार्थिनींना हिंदी सोबत अन्य भाषांचा स्वीकार करून त्या कशा आत्मसात कराव्यात याचे मार्गदर्शन केले.
दिव्यांग विद्यार्थिनींनी सादर केलेले गीत, पल्लवी कराटे हिने सादर केलेले सच्ची देशभक्तीपर भाषण व पपेट शो हे उल्लेखनीय होते. दहावी ब च्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रशालीतील आठवी ते दहावीतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनींना दरवर्षी हिंदी दिनानिमित्त हिंदी राष्ट्रभाषा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सावली शिंदे हिने केले.

    Post Views:  373


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व