इंदूर-अमळनेर बस अपघातात एका बालकासह 13 प्रवाशांचा मृत्यू


मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये : मुख्यमंत्र्यांची घोषणा
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Jul 2022, 8:45 PM
   

 मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून, यामध्ये आठ  पुरूष, चार  स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत झालेल्या  प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदूर-अमळनेर बस क्रमांक एमएच 40 एन 9848 ही आज, 18 जुलैला सकाळी 7.30 वा. इंदूर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10 ते 10.15 च्या दरम्यान मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरीमधील नर्मदा नदीच्या पुलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257- 2223180, 0257- 2217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिद्ध केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक...
दरम्यान, मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्य प्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

    Post Views:  138


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व