एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ


 Chief Editor  20 Dec 2021, 9:14 PM
   

मुंबई : ओमिक्रॉन (omicron) या नवीन कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात ‍‍शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी ही माहिती दिली.राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी १ एप्रिल २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याने या मुतदवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही परब यांनी केले आहे. यापूर्वी स्मार्ट कार्ड योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जाते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु राज्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    Post Views:  348


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व