राजकारण्यांच्या राजकीय उद्रेकाने सामाजिक सद्भावाला गालबोट! : संजय एम.देशमुख
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
30 Apr 2022, 11:40 AM
समाजात अशांतता पसविणार्या विघातक प्रवृत्तींचे थैमान कितीही माजले तरी जोपर्यंत बहूसंख्य माणसातले माणूसपण जीवंत आहे,आणि मानवतावादाच्या वाटेने चालणार्या अशा सद्विवेकी बुद्धीवादी संवेदनशील लोकांचा प्रभाव आहे, तोपर्यंत निरोगी समाजव्यवस्थेला तडा जाऊ शकत नाही. अशांततेच्या थोड्याफार वावटळी येतात. विघातक प्रवृत्तीच्या राक्षसी विचारांची धुळ उडवत जातात. परंतू अशा प्रवृत्तीविरूद्ध विचारवंत समाज जेव्हा जागृत होतो, तेव्हा या लाखो शांतीदुतांच्या विचारांच्या प्रभावी फुंकरींनी ही धुळ क्षणार्धात पिटाळली जाते. असेच तात्कालिक अशांतता पसरविण्याचे भाजप आणि त्यांच्या स्वार्थप्रेरीत धर्मांध ठेकेदारांकडून कोणी भोंग्यांचे तर कोणी हनुमान चालिसाचे राजकारणातून केले जात आहेत. यातून सामाजिक सद्भावाला गालबाट लागू शकते.
वर्तमानात जाती-जातीत धर्मा-धर्मात भांडणे लावून जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरविण्याच्या ठेकेदारीची कंत्राटं काही विघ्नसंतोषी, मानवताप्रतारक, राजकारण्यांच्या हातात एकवटलेली आहेत. जातीय दंगलीचे बिजारोपण हे राजकारणाच्या बाजारातून पसरविल्या जात आहे. त्याकरीता सोशल मिडीया हा शाप म्हणावा की वरदान हे ठरविण्याची वेळ आता आलेली आहे. तंत्रज्ञान कसे हाताळावे त्याचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठी व्हावा की माणसं संपविण्यासाठी हे लक्षात घेण्याची गरज समाजातील विघातक विद्रोही लोकांना आज वाटत नाही.गैरफायदा घेणारांचा विचार केला तर त्या दृष्टीने शाप ठरू शकतो, आणि तंत्रज्ञानाच्या या दालनाचा उपयोग करून त्याचा सामाजिक विकासाच्या प्रक्रियेसाठी जर उपयोग झाला तर ते मानव जातीसाठी फार मोठे वरदान ठरू शकते.
दंगलींचे वणवे हे आज सोशल मिडीयातील कल्पोकल्पीत भडकावू पोस्टच्या प्रसारातूनच जास्त घडत आहेत. गेली २ वर्षे कोरोनाच्या महासंकटाशी मुकाबला करीत वारंवार लॉकडाऊन, उद्योग धंदे बंद, आर्थिक आघात झेलून समाज अजूनही स्थिर झालेला नाही. सामुहिक संकटांना तोंड देत असताना मानवता, भाईचार्याचे मानवी समाजात स्थान काय हे कोरोना काळातील उदाहरणावरून माणूस अजून शिकला पूर्ण शिकला नाही. ही गोष्ट समाजासाठी कधीकाळी मोठ्या धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळेच त्याचे पडसाद अनेक ठिकाणी आजपर्यंत उमटलेले आहेत. अशा अस्थिर वातावरणात भाजपचे नेते चिथावणीखोर भाषणे देऊन जातीय विभाजन करण्याचा प्रयत्न करतात. तर राज ठाकरे भोंगा प्रकरण गाजवून आणि खोटारडे राणा दाम्पत्त्य हे सामाजिक अशांतता पसरविण्याचे प्रयत्न करीत आहेत. असे हे समाजप्रतारक राजकारणी समाजात शांतता प्रस्थापित करून मानवतावादी विचार वृद्धींगत करण्यासाठी जगतात, की जाती धर्माच्या
नावावर लोकांना एकमेकांशी भिडविण्यासाठी याचा सुज्ञ जाणत्या लोकांनी खरा विचार करण्याची वेळ आलेली आहे, आणि तो क्रमप्राप्त आहे. नाहीतर मानवतेवर दानवतेचे आक्रमण होऊन प्रहार व्हायला वेळ लागणार नाही. याचा बोध मागील अनेक हिंसाचार प्रकरणातून घेतला पाहिजे. नाही तर आज गांधी, नेहरू आणि भगतसिंग, राजगुरुंसारख्या स्वातंत्र्यविरांच्या त्यागाला तुच्छ मानुन त्यांची निंदानालस्ती करणारे मुळात काही चारित्र्यहिन बिनडोक पुढे येत आहेत. त्यांना आमच्या राज्यकर्त्यांकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या जाते.अशा चिल्लर भिकारड्या व्यक्तींनी देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या कितीही निंदानालस्ती केल्यात तरी देश आणि संविधानाचे रक्षक म्हणविणारे अवाक्षरही बोलत नाहीत. हे कोणत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे,याची उत्तरे मागण्याकरीता जनतेने आता पुढे आले पाहिजे. दंगली घडवून आपल्या भावंडांच्या मालमत्तांची नासधूस करावी, आर्थिक हानी करून त्यांना रक्तांच्या थारोळ्यात पाडणे हा पुरूषार्थ नाही. उलट हे प्रकार कसे काय घडतात किंवा ऐन निवडणुकांच्या तोंडावर आणि नेहमी मतांची व्होटबॅंक मजबूत ठेवण्यासाठी जाणून बुजून घडविले जातात. याच्या वास्तव विचार व्हावा.त्याच्या मुळाशी जाऊन आपल्या भावांवर हल्ले करण्यापेक्षा माणुसकीवर आघात करणार्या समाजविघातक राजकीय प्रवृत्तींना पिटाळून लावण्यासाठी आपली सामुहिक शक्ती खर्च केली पाहिजे. हल्लेखोर हे लेबल आपल्या कपाळावर लाऊन घेण्याऐवजी आपल्या विचार आणि बाहूबलांच्या उपयोग समाजरक्षणासाठी घडवून समाजवीर ही उपाधी मिळविणे हेच आपल्या जन्माचे खरे सार्थक आहे. हे सत्त्य चुकीची पाऊले टाकणार्या लोकांनी वेळीच ओळखलं पाहिजे. एसटी कर्मचार्यांचा संपही अशाच प्रकारे चिघळविण्यात आलेला आहे. स्वतः देशभर खाजगीकरणाचा सपाटा सुरू करायचा आणि इकडे महाराष्ट्रात एस.टी. महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरणाच्या एस.टी. कर्मचार्याच्या मागणीला पाठिंबा द्यायचा, ही दोगली चाल विकासाचा खेळखंडोबा करण्याची दुष्कृत्ये आहेत. एस.टी. कर्मचार्यांचे वेतन फारच कमी होते, ते वाढले पाहिजे ही मागणी समर्थनिय होती. परंतू अॅड. गुणरत्न सदावर्ते सारख्या वकिलाने एस.टी. कर्मचार्यांच्या अनेक कुटूंबांचे, आयुष्यातील अनेक वर्षांचे नुकसान केलेले आहे. अनेक हिंसाचारामध्येही मानवतावादाचेही दर्शन घडले. मुसलमानांनी हिंदुची मंदिरे वाचवण्यासाठी तर हिंदू मुसलमान समाजाच्या मशिदी वाचवण्याकरीता समुहशक्तीने एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले. अशा या समाजातील उद्रेकाला काबूत आणून शांतता निर्माण करणार्या मानवतावादी बांधवांकडून तरी या उपद्रवी राजकीय नेत्यांनीच काहीतरी शिकलं पाहिजे. दंगलीचे वणवे सामंजस्याच्या शब्दांनी शमविण्याऐवजी त्यात आणखी राळ टाकून त्याला भडकविण्याचे प्रयत्न करणे ही विनाशी विचारसरणी विरोधी पक्ष म्हणविणार्या भाजपच्या नेत्यांमध्ये खालूनपासून वरपर्यंत पक्की भिनलेली आहे. यासाठी अनेक राजकीय नेते आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. ह्या घटना कशाच्या निदर्शक मानाव्यात? जीवनमानाच्या प्रश्नांकडे लक्ष न देता अनावश्यक गोष्टींचे भांडवल करून समाज ढवळून काढणे ही राजकीय नेत्यांची गैरकृत्त्ये समाज रक्षणची नव्हे तर भक्षण करणारी ठरतात. याचा विचार आता समाजाला करावा लागणार आहे. समाजातील लोकांच्या डोक्याचा ताबा घेऊन त्यामध्ये सतत विषारी विचार भिनवत रहायचे, काहीतरी निमित्त घडवून लोकांकडून एकमेकांची टाळकी फोडून घ्यायची, आणि त्यांचे भळभळते रक्त पाहून मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची नुकसानं पाहून अघोरी आनंद व्यक्त करीत रहायचा ही राजकारण्यांची क्रूर शकूनी चाल आहे. परत याची सर्व खापरं शासनावर फोडून हे शासन अमुक एका जातीचे आणि धर्माचे समर्थक कसे आहे, असे खोटे प्रचार करीत रहायचे. ही विघातक वृत्ती म्हणजे खर्या माणसातील शहाणपणाचे लक्षण निश्चितच नाही. कोरोनातही तेच झाले. अनेक मुर्खांना आघाडी सरकारच्या विरुद्ध बोलण्यासाठी डोक्यावर नाचविले गेले. यापुढे मरणार्या लोकांची यांना कधीही चिंता नव्हती. अकलेचे दिवाळे निघालेल्या अशा राजकारण्यांचे हे विघातकी प्रयत्न हे विकासाचे नव्हे तर समाज नासविण्याचे कुटील डाव आहेत. याचा विचार मानवतावादाचे महत्व ओळखणार्या सुज्ञ लोकांनी आता केला पाहिजे! एकत्र येऊन केलेल्या सामुहिक शक्तीचा उपयोग हा एकमेकांची टाळकी फोडण्यासाठी नव्हे तर सामाजिक शांतता प्रस्थापनेसाठी विधायक विकासासाठी झाला पाहिजे!
संजय एम.देशमुख,
संपादक मोबा.९८८१३०४५४६
Post Views: 290