मुख्यमंत्री कामात... सत्तांतूर उपद्व्यापी जोमात! : संजय एम.देशमुख


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Jun 2022, 9:43 AM
   

महाआघाडी सरकारमध्ये बिघाडी घडवून सरकार पाडण्यासाठी प्रथम सुरत नंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये पंचतारांकीत सोहळा सुरू आहे.एका लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक देशात प्रजेच्या घामाच्या पैशांची अनैतिक राजकारण्यांकडून किती मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते याची प्रदर्शने भारतातील अनेक सरकारे पाडण्याच्या सोहळ्यातून जगातही प्रक्षेपित झालेली आहेत.अशाच प्रकारे या बेजबाबदार नेत्यांकडून महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांसाठी आतापर्यंत ३००० हजार कोटी रूपयांचा चुना लागल्याचे वृत आहे.
                          हे सर्व घडत असताना सर्व भावनिक आवाहने आणि स्पष्टीकरणे देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र आपल्या जनसेवेच्या कार्यात सक्रिय झालेले आहेत.काल त्यांनी राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त आणि मंत्रालयीन सचिवांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी राजकीय डावपेच हे चालतच राहणार प्रथम जनतेच्या कामांकडे लक्ष द्या, तेच आपले प्राधान्याने कर्तव्य समजा.त्यात कोरोनाचा आढावा,पेरण्यांची स्थिती,बियाण्यांची उपलब्धता,शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाच्या व्यवस्था,नाल्या साफसफाई व मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांबाबत योग्य ते निर्देश दिले.यात एक संवेदनशील विषय आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीचा होता. कोकणातील यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश तथा पाणी सोडण्याबाबतचे पूर्वसंदेश  सायरनव्दारे व इतर माध्यमातून तातडीने अचुक देण्याचे आदेश दिले. आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोईसुविधा योग्यरितीने सांभाळण्यासह मास्क सक्तीबाबत चर्चा केली.या सर्व विषयांवर बोलत असतांनाच त्यांनी जनतेची कामं या विषयावर जोर देऊन ती कामं अडू देऊ नका, माझ्याकडे तातडीने घेऊन या अशा विशेष सुचनाही दिल्यात. 
                      मुख्यमंत्री पदावर  विराजमान झाल्यापासून संकटाची मालिका गळ्यात घेऊन अनेक निर्णय घेणारे आणि कोरोना निर्मुलनात गौरवास्पद कामगीरी बजावणारे मुख्यमंत्री म्हणून अगोदरच देशात त्यांच्या कार्याची दखल घेतली गेलेली आहे.तरीही विरोधकांच्या घाणेरड्या आरोपांचे गतिरोधक पार करीत न डगमगता वेळपरत्वे गाडीचा गिअर बदलून आपल्या कामाला गती आणि दिशा देण्याचे प्रयत्न त्यांनी केलेत.त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जनतेच्या मनात कोरले गेलेले आहे.
               विरोधकांच्या कोल्हेकुईला जास्त भाव न देता सौम्य समज देऊन,विनोदी फटकेबाजी, आणि जबाबदारीचे भान ठेवत योग्य वक्तृत्वशैलीतून एक सभ्य, संवेदनशील, संयमी, सुसंस्कृततेचा वारसा लाभलेले खानदानी मुख्यमंत्री, आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे समजून घेणारे संतुलित विचारांचे परीपक्त नेते म्हणून आपली प्रतिमा सिध्द करण्यात ते यशस्वी झालेले आहेत.वर्तमान परिस्थितीतही भाजपच्या कुरापतींच्या वरदहस्ताने शिवसेनेतील बंडखोरीचे काळे ढग दाटून आलेले आहेत. तरीही सत्ता टिकवण्यासाठी या डावपेचांमध्येच मश्गूल न राहता सर्व विसरून  यंत्रणांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
                      राजकीय डावपेच हे चालतच राहणार म्हणून शेतकरी, वारकरी सुविधा, जनविकास आणि पावसाळ्यातील प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या कृतीतून जनसेवेची बांधिलकी स्विकारलेले तळमळीचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर वेळोवेळी झालेल्या शिक्कामोर्तबातील सत्त्य समोर आलेच....परंतू यामुळेच विरोधकांच्या वेळोवेळी झालेल्या जळफळाटांचेही स्मरण या निमित्ताने झाले....! त्यांच्या अविरत कामामुळे,आपलेपणाच्या संवादामुळे जनतेला आपल्या घरातील आपला मुख्यमंत्री वाटावा असे स्थान जनतेच्या हृदयात उध्दवजींनी निश्चितच निर्माण केलेले आहे.कोरोना काळात ते अविरत कामात होतेच. 
                      आजही मतलबी बंडखोरांनी धोकेबाजी करून सत्ता संकटात आणली असतांनाही ते समंजसपणे राजकीय डावपेच चालूच राहणार कामाला लागा म्हणून यंत्रणांना चेतना देऊन जागवित आहेत. म्हणजे आजही आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कामात असतांनाच धर्मांध उपद्व्यापी मात्र सत्तांतराच्या स्वार्थमुलक अघोरी महत्वाकांक्षेत मश्गुल आहेत. त्यासाठी करोडो रूपयांची जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत आहेत. कर्तव्यबध्द नेते आणि बांधिलकी विसरलेल्या कृतघ्न नेत्यांमधील हे किती विसंगत आचरण आहे.हेच चित्र राज्यातअडीच वर्षांत आणि देशातही चालूच होते, आणि आजही तेच आहे. धर्म आणि देवादिकांची नावं घेणाऱ्या अशा विचित्र लोकांना खऱ्या कर्तव्याची उपरती केव्हा होणार?
                    हत्ती रूबाबदारपणे रस्त्यावरून चालत राहतो.श्वान मात्र त्यांच्यामागे भुंकत राहतात.परंतू त्या आवाजाने ना त्यांच्या चालण्याच्या गती मध्ये फरक पडत, ना जाण्याच्या ध्येयदिशेकडे.....त्याचप्रमाणे या शिवसेनेच्या वाघाने आपले काम चालूच ठेवले.अचानक बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून आजच काय कमी पडले होते ही एक चिंतनिय बाब आहे. मुलाला खासदारकी,त्यांना आमदारकी, सन्मानाच्या वागणूकीसोबतच,मंत्रीपदे मुख्यमंत्र्यांकडील नगरविकाससह महत्वाची तिनं खाती .यापेक्षा साधारण रीक्षाचालक म्हणून समोर आलेल्या या माणसाला अजून काय हवे होते? याचे उत्तरही राज्यातील जनतेकडे तयार आहे. वाटल्यास मला मंत्रीपद देऊ नका परंतू आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा या मागणीतूनच एकनाथ शिंदेंची लाचारी आणि अगतिकता समोर आलेली होती.
                    मागीलवेळी मी यांच्यासोबत बसू शकत नाही म्हणणाऱ्या शिंदेची भाजपसोबतची मतलबी युती त्याचवेळी स्पष्ट झालेली होती. अगोदरच महाराष्टातील अनेक नेते आज ईडीला घाबरत आहेत.कारण या देशात स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर करणारे हूकूमशहा सत्ताधारी विराजमान आहेत.स्वतःपापं करायची, अनैतिकतेने माया कमवायची, आणि स्वतःचे जीव वाचविण्यासाठी अयोग्य लोकांना समर्थन देऊन  महाराष्ट्रातील जनतेचे जीवनमान संकटात टाकायचे. हीच का तुमची निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी...? नेत्यांची पापं निस्तरायला आणि त्यांना सरकारी तिजोऱ्यांची उथळपट्टी करू देण्याचा ठेका जनतेने उचललेला नाही.यहा जो करेगा वही भरेगा. महाराष्ट्रात हे चालणार नाही. इथे  कोण्या नेत्यांच्या बापांची जहागीरदारी नाही.
                            आपल्या माना ईडीच्या पिडेतून वाचविण्यासाठी उध्दव ठाकरे ऐकत नाहीत म्हणून मग बंडखोरी....!दुसरे एक कारण अजून आहे.राज्यातील वर्ग १ ते ४ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मंत्री आणि आमदारांची आर्थिक फिल्डींग होती.याची कुणकुण मुख्यमंत्र्यांना लागली आणि त्यांनी बदल्यांचे आदेशच रद्द केले,आणि तातडीची असेल तर माझ्या परवानगीशिवाय करू नका म्हणून सुचना दिल्या.या सत्त्याला  काही अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळालेला आहे .अगोदर ईडी आणि नंतर त्यात अजून आर्थिक गोची.म्हणून यात तोंडावर पडून जखमी झालेले इकडचे तिकडचे सगळे दुखरे मंत्री,आमदार एकत्र झाले, आणि बंडखोरी करून सत्तांतराच्या कामात लागले.याला कारण आणि गोंडस नाव दिले ते हिंदुत्व....! आणि निधीच्या बाबतित राष्ट्रवादीची सापत्न वागणूक....! म्हणजे धर्माचे सर्वेसर्वा, हिंदुप्रतिपालक तेवढे फक्त हेच मतलबी, भ्रष्ट, आणि उध्दव ठाकरेंपासून तर शरद पवार, अजित पवार आणि सगळे हे  हिन्दूंचे दुश्मन..! मग नोटाबंदी, जीएसटी, चुकीची आर्थिक धोरणे. बेरोजगारी,वाढती प्रचंड‌ महागाई,शेतकरी प्रश्न आणि त्यांच्या आत्महत्त्या यातील ८० टक्के वेदना फक्त हिंदुनाच आहेत.तिथे यांच्या हिंदुत्वाच्या भावना कुठे गायब असतात.खोट्या हिंदुत्वाचे कार्ड वापरून हे ढोंगी लोक हिन्दु हिन्दु करून वर्षानुवर्षापासून हिंदूंना फसवत आहेत.त्यांच्यावर अन्याय करीत आहेत.पुढे त्यांच्याच मतांच्या खिरापतीवर सत्तेचे गैरवापर करून हे धर्माचे ठेकेदार ऐशोराम करीत आहेत.
                   यांना सकाळच्या शपथविधीत अजित पवार, गोव्यातील बिफ,नितिशकुमार,मुफ्ती मोहम्मद सईद,आणि जावाई म्हणून अब्बास नक्वी,व शहानवाज हुशेन चालतात, आणि मतलबासाठी फक्त आघाडी सरकार आणि उध्दव ठाकरेंना हे हिन्दुंचे दुश्मन म्हणून ओरडतात. या ढोंग्यांच्या ह्या कोल्हेकुईचे आवाज जनतेने शहाणपण घेऊन कायमचे दाबले पाहिजेत.आघाडी सरकार हटवण्यासाठी ३००० कोटी रूपयांचा  चुराडा या लोकांनी केला.तेवढे पैसे देशाच्या आणि जनतेच्या  विकासासाठी हे वापरतील काय? ते सर्व आमदार जबरदस्तीने डांबून ठेवलेले आहेत.ते स्वतः आणि  त्यांचे परिवार अस्वस्थ झालेले आहेत.अशावेळी देशातील कोणत्या तरी  मानवाधिकारवाल्यांना तरी जाग येईल का? की भाजप आणि मोदींच्या समोर न बोलण्याचाच विडा सर्वांनी उचललेला आहे.  
                      आपल्या पक्षातील बंडखोरी आणि नाराजी पाहून उध्दवजींनी ताबडतोब वर्षा सोडून मातोश्रीवर मुक्काम हलविला. जीवनमुल्ले आणि नैतिकतेचे आदर्श पाळणारे स्वाभिमानी मुख्यमंत्री म्हणून त्यांचेकडे शिवसैनिक आणि राज्यातील जनतेने बघितले आहे.त्यांच्यावर सत्ताकांक्षी विरोधकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आणलेल्या संकटाची दखल शिवसैनिक आणि जनतेकडून घेतली गेलेली आहे.अनेकांनी भावनाविवश होऊन दु:खही व्यक्त केले आहे. फक्त मुख्यमंत्री  आता भावना बाजूला ठेऊन अविचारातून घाई न करता या नाठाळांच्या माथी काठी घालण्यासाठी राजीनामा द्यायचे तेवढे थांबलेले आहेत.स्वाभीमानी नेते आपल्यावर आरोप झाल्यावर तात्काळ राजीनामा देऊन मोकळे होतात.परंतू उध्दवजींबाबतचे प्रकरण वेगळे असल्याने त्यांनी तशी घाई करणे योग्य नव्हते.खोट्यांसमोर सत्त्यतावादी लोकांनी घाई न करता स्वाभिमानाच्या भावनांना आवर घातला पाहिजे.
                        माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुखांनीही तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कारण ते रक्तपिपासू गोचिडांसारखे सत्तेला चिकटून बसणारे नेते नव्हते.म्हणून त्यांनी पून्हा येईन सारख्या  महत्वांकांक्षी घोषणाही केल्या नाहीत.भाजपमध्ये एक नितीन गडकरी अपवाद सोडले तर असे नेते आज दुर्लभ आहेत. तत्ववादी अटलजी आणि अडवाणींचा काळ केव्हाचाच बदललेला आहे. उध्दव ठाकरेंनी नकार दर्शविल्यावरही  ईच्छा नसतांना त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले होते.त्यामुळे सुध्दा काहीही पात्रता नसलेले शिंदे दुखावलेले होतेच.सत्तास्थापनेच्या भाजपच्या खडतर उपद्व्यापांना तोंड देत अग्निपरीक्षेतून मुख्यमंत्रीपदाची सुत्रे त्यांना हातात घ्यावी लागली होती.आता योग्य विकास आणि कल्याणाची कामे करू असा संकल्प असतांनाच अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्ती व कोरोना संकटाचे निवारणात आणि भाजपच्या मंदिरं उघडा,घंटा वाजवा सारख्या जनतेच्या जीवावर बेतणाऱ्या गलिच्छ राजकारणाला तोंड देण्यात त्यांना बरीचशी शक्ती खर्च करावी लागली.त्यात जनतेच्या संकटकाळात याच विरोधकांच्या आणि त्यांच्या भाडोत्री दलालांच्या अपेक्षित सहकार्याच्या सर्व संकेतांना तिलांजली देऊन केलेल्या तेव्हाच्या उठाठेवी  जनतेच्या  कायम  स्मरणात आहेत. 
                          एवढा प्रचंड आततायीपणा भाजपने सुरवातीपासून केलेला आहे.आता कोरोनाचे संकट कमी झाल्यावर तरी योग्य रितीने विकास आणि जनकल्याणाची कार्ये मार्गी लागावी असे महाराष्ट्रीयन जनतेला वाटत होते.परंतू जन्मत:च शलकपट, सुडाचे राजकारण आणि अमानवता सोबतच घेऊन आलेल्या भाजपने सरकारे अस्थिर करून सामाजिक अशांतता पसरविण्याचा वसाच  जणू घेतलेला आहे.असे त्यांच्या विकास कार्यात व्यत्यय आणि जनतेच्या हिताआड येणाऱ्या कुरापती वाटचालीवरून आता पूर्ण स्पष्टच झालेले आहे.
                      आता बंडखोरीचा भूकंपात आणि सत्तांतराच्या स्वप्नात आपल्याला संरक्षण देणारी सुपर पावर म्हणून शिंदे या रंग बदलणाऱ्या चुकीच्या लोकांवर विसंबून आहेत.त्या कोषातून बाहेर येण्यासाठी कायदेशीर पेचप्रसंगामुळे त्यांना किती वेळ लागेल,आणि ते कितीतरी यशस्वी होतील हे येणारा काळच सांगेल.परंतू या विनाशी मर्कटलिलांकडे जास्त लक्ष जनतेनेही देऊ नये आणि मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा तर कामात लागलेल्या आहेतच.म्हणून अख्खा महाराष्ट कामात,यंत्रणांसह मुख्यमंत्रीही कामात आणि रिकामटेकडे आणि उन्मादी धर्मांध विरोधक व बंडखोर मात्र वळवळ करण्यात जोमात आहेत..बंडखोरांची संमोहनाची नशा उतरायला काही वेळ लागणार आहे.तेव्हा शिवसेनेकडील त्यांचीही वेळ गेलेली असेल असेच उत्तर त्यांच्याच भाषेत त्यांना मिळणार आहे...!
संजय एम.देशमुख 
जेष्ठ पत्रकार अकोला  
मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  311


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व