रक्षाबंधन दिनी बहिणींना जलसमाधी; 20 महिला वाहून गेल्याची भीती
यमुनेत 50 जणांची नाव उलटली ; 4 मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
11 Aug 2022, 8:57 PM
लखनऊ : आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी निघालेल्या 20 ते 25 बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशीच जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी दुर्घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी नाव यमुनेत उलटल्याने ही दुर्घटना घडली. या नावेत मुलांसह 20 ते 25 महिला प्रवास करीत होत्या, अशी माहिती आहे. हा सगळ्या महिला रक्षाबंधनासाठी त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत सायंकाळपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून, 25 हून जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहोचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरू केला होता. या नावेत 50 जण होते. नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि पलटली.
एका प्रत्यक्षदर्शीने याबाबत माहिती दिली की, माझ्या गावाहून पत्नीला घेऊन सासरी राखी बांधण्यासाठी निघालो होतो. नदी किनारी आल्यावर तिथे एकच नाव होती. दुपारी 3 वाजण्याचा सुमार होता. पलीकडे जाण्यासाठी अनेकांची गर्दी तिथे जमा झाली होती. बघता बघता नावेत 40 ते 50 प्रवासी जमा झाले. काही जणांनी त्यांच्या मोटारसायकलीही या नावेतच ठेवल्या होत्या.
नाव जेव्हा नदीच्या मध्यभागी आली, तेव्हा नाव हलण्यास सुरुवात झाली. नावेतील लोक घाबरून नावेतच इकडून-तिकडे जाऊ लागले. यातच एका बाजूला लोकांची संख्या जास्त झाली आणि नाव एकदम पलटली. काही जण पोहू लागले, काही जण मुलांचा आणि महिलांचा शोध घेत होते. बघता बघता अनेक जण नदीच्या धारेत वाहून जात होते. या अपघातात महिला आणि लहान मुले मात्र बुडाली. याचवेळी आजूबाजूने जात असलेल्या एक दोन नावांनी बुडालेल्या माणसांना वाचवण्यास सुरुवात केली. अशातच मीही एका नावेवर चढलो, पण बायको आणि मुले वाहून गेलीत, असे सांगितले.
दुसर्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नावेवर 40 ते 50 जण होते. त्यातील 15 जणांना वाचवण्यात आले. 25 ते 30 जण वाहून गेले आहेत. नदीतून वाचून आलेल्या के. पी. यादव यांनी सांगितले की, मी लखनऊतून समधराला आलो होतो. समधरेला बायकोला सोडून मी बहिणीकडे रक्षाबंधनाला निघालो होतो. मला बरैचीला जायचे होते. माझ्याकडे माटरसायकल होती. नावेत ती ठेवली होती. नाव बुडाल्याने आता मोटारसायकलही गेली आहे.
सोसाट्याच्या वार्याने बोट बुडाली
बोट फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाटाकडे जात होती. नदीत मध्यभागी पोहोचताच जोरदार वार्याने बोट उलटली, असे पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे आठ जण पोहत बाहेर आले तर किमान 20 जण बेपत्ता आहे, असे पोलिस अधिकार्याने सांगितले. गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
Post Views: 220