साक्षगंधाचे परिवर्तन त्यांनी केले विवाहात


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Dec 2022, 6:01 PM
   

अकोला   : विवाह सोहळ्यातील अवास्तव खर्चास फाटा देण्यासाठी साक्षगंधाचे रूपांतर एका आदर्श विवाह सोहळ्यात घडवून आणण्याचा स्तुत्य उपक्रम पाटील समाज अकोला ने घडवून आणला आहे.
स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात आज सकाळी दोनद येथील दत्तात्रय सुभाष वानखडे व निंबी येथील शरयु निळकंठराव मालोकार या नियोजीत वर-वधूचा साक्षगंध अगदी साध्या पध्दतीने संपन्न झाला. समारंभास पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, इतर पदाधिकारी विनायकराव शेळके, दिनकरराव सरप, प्रदीप खाडे, राजेन्द्र मोहोकार, वासुदेवराव कडू, जगदीश मुरूमकार आदी उपस्थित होते. त्यांनी मुला-मुलीच्या वडीलांशी चर्चा करून समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी याच साक्षगंधात विवाह उरकून टाकण्याचा प्रस्ताव त्यांचे समोर मांडला. त्यांनीही दोन्ही कडच्या नातेवाईकांशी तसेच शरयु व दत्तात्रय या वधू वराशी चर्चा करून या प्रस्तावास लगेच मान्यता दिली. आणि क्षणात येथील वातावरण बदलून विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली. कमतरता होती फक्त हारांची व वाजंत्रीची. त्याचीही त्वरीत व्यवस्था करण्यात आली. भटजी व वर्‍हाडी हजर होतेच. शरयु व दत्तात्रय हे दोघेही बी.ई (इ.ए.) झालेले आहेत. त्यांनीही या साध्या सोहळ्यास मान्यता देवून उच्च शिक्षीत मुला-मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी शिव विवाहातील मंगलाष्टके सादर केलीत. आणि अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह संपन्न झाला. या विवाहास अशोकराव अमानकर, विनायकराव शेळके, दिनकरराव सरप, प्रदीप खाडे, जगदीश मुरूमकार, राजेन्द्र मोहोकार, अशोक पटोकार, सुनील जानोरकर, अविनाश नाकट, वासुदेवराव कडू, रामचंद्र त्रिकाळ, विनायकराव गावंडे, सुरेश गाढे पाटील, श्रीराम पाटील कुकडे, गुणवंतराव जानोरकर, विक्रम जानोरकर, दिलीप माळी, अशोक वानखडे, शिवशंकर नळकांडे, निळकंठराव मालोकार, साहेबराव काळंके, मधुकर महल्ले आदी उपस्थित होते.

    Post Views:  198


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व